बीडच्या रस्त्यावर रक्तपात, आधी गोळीबार मग धारदार शस्त्राने पाठलाग करत मारलं
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Beed Crime News : गोळ्या न लागल्याने आरोपीने शिंदे यांचा पाठलाग करत धारदार शस्त्राने सपासप वार केले.
बीड : बीडमधील गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील अंकुश नगर परिसर मंगळवारी दुपारी हत्येच्या घटनेने हादरले आहे. नाल्याचे काम सुरू असताना काम करणाऱ्या एका कामगारावर आधी बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आले. मात्र, सुदैवाने या गोळ्या संबंधित व्यक्तीस लागल्या नाहीत. त्यानंतर आरोपीने त्या कामगाराचा पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात हर्षद उर्फ दादा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हर्षद उर्फ दादा शिंदे हे अंकुश नगर परिसरात सुरू असलेल्या नाल्याच्या कामाच्या ठिकाणी काम करत होता. याचवेळी विशाल सुर्यवंशी नावाचा आरोपी घटनास्थळी आला. नेमका वाद कशावरून झाला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी, आरोपीने अचानक बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्या न लागल्याने आरोपीने शिंदे यांचा पाठलाग करत धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
advertisement
पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत पंचनामा केला. यानंतर फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, त्यांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
advertisement
शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे नाव विशाल सुर्यवंशी असे जाहीर केले असून, त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू आहे.
बीड शहरात भीतीचे वातावरण
advertisement
दिवसा ढवळ्या बंदुकीच्या फायरिंगनंतर धारदार शस्त्राने हत्या झाल्याने बीड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांकडून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या रस्त्यावर रक्तपात, आधी गोळीबार मग धारदार शस्त्राने पाठलाग करत मारलं








