ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी, सुप्रिया सुळे यांनी रान उठवलं, छोट्या भावाकडून प्रत्युत्तर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Tuljapur Drugs Case: भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पत्र लिहून सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहेत.
मुंबई : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे याला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस राजाश्रय दिला जात असल्याबाबतचे पत्र सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पत्र लिहून सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहेत.
अजितदादा पवार आणि सुनेत्रा आत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात, असे राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले.
advertisement
...तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते
तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते.
advertisement
दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच आरोपी बनविले, सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले
आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित 'मीडिया ट्रायल' करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळ उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः मेसेज करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगणे यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उपडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले (संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा जबाब जोडला आहे). दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच.
advertisement
पुरावे दाखवायची माझी तयारी
अंजलीताई दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या, मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला, यात नेमकं चुकीचं काय झाले आहे? जरा आपण सांगू शकलात, तर बरे होईल! म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय हे कळेल. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे, असे राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले.
view commentsLocation :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
November 19, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी, सुप्रिया सुळे यांनी रान उठवलं, छोट्या भावाकडून प्रत्युत्तर


