बंडोबा काही केल्या ऐकेना, निवडणुकीच्या तोंडावर भाजपची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur Mahapalika Election: सोलापूर महानगरपालिकेत भाजपा कडून बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा दिल्यानंतरही उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी करणाऱ्या २८ जणांवर भारतीय जनता पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक माजी उपमहापौर, सहा माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच बंडखोरांना इशारा दिला होता. त्यानंतरही माघार न घेणाऱ्या २८ कार्यकर्त्यांना भाजपने पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्वजण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे होते. तब्बल ८०० हून कार्यकर्त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपकडे व्यक्त केली होती. मात्र, भाजपकडे या वेळी इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपकडे सर्वाधिक चुरस दिसून येत होती. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे. काहींनी अन्य पक्षाकडून निवडणूक लढविणे पसंत केले आहे, तर काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत.
advertisement
उपमहापौर आणि नगरसेवकांवर कारवाई, पक्षातून बाहेरचा रस्ता
माजी उपमहापौर राजेश काळे, विठ्ठल कोटा, वैभव हत्तुरे, श्रीनिवास करली, डॉ. राजेश अनगिरे या माजी नगरसेवकांसह बाबूराव जमादार, ॲड. शर्वरी रानडे, अमरनाथ बिराजदार, काशिनाथ झाडबुके, निर्मला तट्टे, निर्मला पासकंटी, प्रकाश राठोड, मंजूषा मुंडके, राजशेखर येमूल, राजश्री चव्हाण, राजू आलुरे, राजेश काळे, रुचिरा मासम, रेखा गायकवाड, विजय इप्पाकायल, वीरेश चडचणकर, श्रीनिवास पोतन, श्रीशैल हिरेमठ, सीमा महेश धुळम, स्नेहा विद्यासागर श्रीराम यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.
advertisement
भाजपचे हे बंडखोर मातब्बर आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता जास्त होती. तो धोका ओळखून सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरांना इशारा दिला होता. स्वीकृत नगरसेवक आणि इतर ठिकाणी संधी देण्यात येईल. त्यामुळे भाजपच्या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अन्यथा दोन दिवसांत मला कारवाई करावी लागेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला होता. त्यानंतरही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यांच्यावर भाजपकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंडोबा काही केल्या ऐकेना, निवडणुकीच्या तोंडावर भाजपची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई









