भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता क्रिकेटच्या मैदानात, अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या, MCA च्या निवडणुकीत चुरस
- Published by:Akshay Adhav
- Reported by:Tushar Rupnavar
Last Updated:
Ravindra Chavan: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
तुषार रुपनवर, प्रतिनिधी, मुंबई : राजकारणातील सक्रिय उपस्थितीसाठी ओळखले जाणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या कार्यकारिणी निवडणुकीत चव्हाण स्पर्धा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
एमसीएच्या कार्यकारिणीची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात प्रस्तावित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासन आणि राजकारणात नवा समीकरणांचा खेळ रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. चव्हाण यांच्या सहभागामुळे या निवडणुकीला अधिक चुरस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविंद्र चव्हाण यांनी मागील काही वर्षांमध्ये भाजप संघटन बळकटीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी दिल्लीचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, क्रिकेट संघटनांच्या निवडणुकीतील त्यांच्या संभाव्य उमेदवारीला हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो, असा कयास लावला जात आहे.
advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशन ही देशातील सर्वात प्रभावी क्रिकेट संस्थांपैकी एक मानली जाते. भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या या संस्थेच्या निवडणुकीत राजकारणाचा प्रभाव नेहमीच जाणवतो. अनेकदा राज्यातील प्रमुख नेते MCA च्या कार्यकारिणीत सक्रीय भूमिका निभावताना दिसले आहेत. आता त्याच परंपरेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
advertisement
चव्हाण यांच्या प्रवेशामुळे एमसीए निवडणूक केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता, राजकीय रंगही घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यपद्धती, संघटन कौशल्य आणि राजकीय संपर्काचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आता क्रिकेट चाहत्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि राजकीय वर्तुळांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, रविंद्र चव्हाण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली एमसीए निवडणूक खरंच लढवणार का? या निर्णयामुळे महाराष्ट्रातील क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत नवे घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता क्रिकेटच्या मैदानात, अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या, MCA च्या निवडणुकीत चुरस