खऱ्या शिवसेनेचा दावा पण एकनाथ शिंदेंना मुंबईत झटका, उद्धव ठाकरे का वरचढ ठरले? ५ कारणं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC Election Results Uddhav Thackeray vs Eknath Shinde: 'आमचीच शिवसेना खरी, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार', अशा वल्गना एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. मात्र मतदारांनी शिंदेसेनेच्या उमेदवारांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही.
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपाठोपाठ मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसला. मुंबई पालिका निवडणुकीत ९० जागा लढवणाऱ्या शिंदेसेनेने दुपारी तीन पर्यंत केवळ २८ जागांवर आघाडी घेतली. मुंबई हा खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 'आमचीच शिवसेना खरी, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार', अशा वल्गना एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. मात्र मतदारांनी शिंदेसेनेच्या उमेदवारांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही. तुलनेत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जवळपास ६० जागांवर आघाडीवर आहेत. समोर आलेल्या निकालातून बालेकिल्ल्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेतृत्व न मानता उद्धव ठाकरे यांनाच प्रमुख म्हणून मान्यता दिल्याचे विश्लेषकांना वाटते.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा चार जागांवर आमनासामना झाला होता. यात तीन जागांवर ठाकरे सेनेने विजय मिळवला. चौथ्या जागी अगदी ५० मतांनी ठाकरे सेनेचा निसटता पराभव झाला. विधानसभा निवडणुकीला देखील असेच चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेना-ठाकरेसेनेमध्ये १० ठिकाणी थेटपणे झालेल्या लढतीत केवळ तीन ठिकाणी शिंदेसेनेला यश आले. यावरून मुंबईच्या बालेकिल्ल्यात अजूनही उद्धव ठाकरे यांनाच मानणारा वर्ग दिसून येतो. असे असले तरी शिवसेना ठाकरे गटाने लढलेल्या १६३ जागांपैकी ६० जागांवर त्यांना यश मिळाले. भारतीय जनता पक्षासोबत समोरासमोर झालेल्या लढाईत विजयी मशाल पेटली नसल्याचे अनुमान आहे.
advertisement
उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर का वरचढ ठरले? ५ कारणं
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे नगरसेवक फोडले पण शिवसैनिकांचे केडर हलले नाही
महापालिका निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे जवळपास ५५ ते ६० माजी नगरसेवक फोडले. या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही दिली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. एकनाथ शिंदे यांनी जरी नगरसेवक फोडले असले तरी शिवसैनिकांची फळी जागची हलली नाही. ठाकरेंचे केडर न हलल्याने प्रत्यक्ष निकालात एकनाथ शिंदे यांना फायदा झाला नाही.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचा कार्यक्रम, पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी
मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा हीच पक्षाची ताकद मानली जाते. किंबहुना शिवसेनेच्या शाखा म्हणजे सर्वसामान्यांच्या अडचणी सुटण्याचे ठिकाण आहे. कुठलीही अडचण असो, जनतेने सेना शाखेत जावे आणि शाखाप्रमुख किंवा पदाधिकाऱ्यांनी अडचण सोडवावी, असा इतिहास कित्येक वर्षांचा आहे. हेच ओळखून निवडणूक काळात मोठ्या सभा घेणे टाळून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन पदाधिकाऱ्यांच्या गाठभेठी घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी शाखाभेटींना पसंती दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. नाराज शिवसैनिक कामाला लागले.
advertisement
दोन भाऊ एकत्र, मराठीच्या मुद्द्यावर मतदारांनी साथ दिली
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात यंदा ठाकरे बंधू एकत्र आले. तसेच प्रचारात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भाजपाला खिंडीत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शिंदेंना मत म्हणजे भाजपला मत, असा प्रचार केल्याने मराठी मतदारांनी शिंदेसेनेला फारसा प्रतिसाद दिले नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
उमेदवारांची योग्य निवड
advertisement
एकनाथ शिंदे यांनी जरी ठाकरेंचे ५५ ते ६० माजी नगरसेवक फोडले असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा होती. त्यापैकी जिंकून येतील, अशा उमेदवारांना उद्धव ठाकरे यांनी प्राधान्य दिले. बंडखोरांनाही व्यवस्थित समजावून सांगत त्यांचे अर्ज माघारी घेतले. उमेदवारांची योग्य निवड केल्याने जवळपास ६० जागांवर उद्धव ठाकरे यांना यश मिळाल्याचे जाणकार सांगतात.
advertisement
शिंदेंपेक्षा मुंबईत ठाकरेच हवेत अशी लोकांमध्ये भावना
काहीही झाले तरी मुंबईत ठाकरेच हवेत, मुंबई ठाकरेंची आणि ठाकरे मुंबईचे, असे भावनात्मक वातावरण मराठी बहुल लोकांमध्ये होते. त्यामुळेही एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला शिवसैनिकांनी पसंती दिल्याचे सांगितले जाते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 3:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खऱ्या शिवसेनेचा दावा पण एकनाथ शिंदेंना मुंबईत झटका, उद्धव ठाकरे का वरचढ ठरले? ५ कारणं










