पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला रॅली काढणं भोवलं, बीड पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका या तरुणांवर ठेवण्यात आला आहे.
बीड : अंमळनेर तालुक्यातील सावरगाव घाट येथे झालेल्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यादरम्यान विनापरवाना मोटारसायकल रॅली काढत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका या तरुणांवर ठेवण्यात आला आहे.
२ ऑक्टोबर रोजी भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी परिसरातील विविध गावांतून हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्याच अनुषंगाने काही तरुणांनी मोटारसायकल रॅली काढत मेळाव्यात सहभागी झाले. मात्र ही रॅली पूर्णपणे विनापरवाना होती. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना रॅली न काढता गाड्या पार्किंगमध्ये उभ्या करून नियमानुसार मेळाव्यात सहभागी होण्यास सांगितले.
advertisement
पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप
मात्र, रॅलीतील काही तरुणांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अरेरावीची भाषा केली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून उद्धटपणा केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून परवानगीशिवाय रॅली काढल्यामुळे वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
advertisement
13 जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकारानंतर अंमळनेर पोलीस ठाण्यात संबंधित 13 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 353 (शासकीय कामात अडथळा आणणे), 188 (सरकारी आदेशाचे उल्लंघन), तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांची कारवाई महत्त्वाची
दरम्यान, भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. तरीदेखील परवानगीशिवाय रॅली काढून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केल्याने त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 05, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला रॅली काढणं भोवलं, बीड पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम