अजिंठा लेणीत पर्यटकांची पळापळ, आग्या मोहोळ उठले अन्..., 10 जण थेट रुग्णालयात
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ajanta Caves: उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढला की मधमाश्या उठण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतात.a
छत्रपती संभाजीनगर: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, शुक्रवारी या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आग्या मोहोळाच्या मधमाश्या सैरभैर झाल्या आणि लेणी क्रमांक 4 परिसरात अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. यात दहा पर्यटक जखमी झाले असून लेणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच अजिंठा परिसरात लेणी पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काही पर्यटक लेणी क्रमांक 4 पाहात होते. तेव्हा वाढत्या उन्हामुळे येथील मोहोळ उठले आणि माशांनी पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मनोज पवार यांनी तत्काळ सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या. तसेच पर्यटकांची आवक काही काळ थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
उन्हाळ्यात मधमाश्यांच्या हल्ल्याचा धोका
उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढला की मधमाश्या उठण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतात. अशा वेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही काळ त्या भागात जाण्यास मनाई केली जाते. तसेच मधमाश्या शांत झाल्यानंतर पर्यटकांना पुन्हा लेणी पाहण्यासाठी सोडण्यात येते, असे पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अजिंठा लेणीत पर्यटकांची पळापळ, आग्या मोहोळ उठले अन्..., 10 जण थेट रुग्णालयात







