अनाथ आश्रमातील लहानग्यांवर जीव लावणाऱ्या 'यशोदा', मायेची पाखर घालतात या आई
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील साकार संस्थेच्या अनाथाश्रमात आई-वडिलांनी सोडलेल्या अनाथ बालकांचा सांभाळ केला जातो. येथील आईंनी मुलांसोबतचा अनुभव शेअर केला आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. बाळाच्या उत्तम वाढीसाठी आई आणि वडील दोघांचंही प्रेम आवश्यक असतं. परंतु दुर्देवानं काही बाळांच्या नशिबात ते नसतं. काही पालक परिस्थितीमुळे आपल्या बाळाला अनाथ आश्रमात सोडून जातात. याच बालकांची स्वप्न साकार करण्याचं काम छत्रपती संभाजीनगरमधील एक संस्था करतेय. या साकार संस्थेत येताना मुलं अनाथ असली तर इथं त्यांना आई भेटते. पोटच्या मुलांप्रमाणे या बालकांचा सांभाळ करणाऱ्या आईंनी लोकल18 सोबत बोलताना आपले अनुभव सांगितले आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्योती नगर या भागामध्ये साकार ही एक सामाजिक संस्था आहे. 1994 पासून ही संस्था शहरामध्ये कार्यरत आहे. काही ठिकाणी परिस्थितीमुळे लहान मुलांना आई-वडील रस्त्याच्या कडेला टाकून देतात किंवा काही कारणास्तव अनाथ आश्रमात सोडून देतात. अशा बाळांचा सांभाळ ही संस्था करते आहे. या ठिकाणी 0 ते 6 वर्षाखालील मुल आहेत. त्यांचा सांभाळ करणाऱ्या महिलांना आई म्हणूनच संबोधले जाते.
advertisement
इथंच मन रमतं
या ठिकाणी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सुशीला गवई या काम करतात. “मी पहिल्यांदा इथे आले तेव्हा या बाळांना बघून मला खूप वाईट वाटलं. सुरुवातीला भीती देखील वाटली की हे काम आपल्याला जमेल की नाही. पण नंतर हळूहळू हे काम मला जमायला लागलं. आता माझं इथं मन रमतं आणि ही मुलं जेव्हा आई म्हणून हाक मारतात तेव्हा खूप छान वाटतं. त्यांचे मी सर्व लाड पुरवते. ते सर्व हट्ट माझ्याकडे करतात आणि ते हट्ट पुरवायला मला आवडतं,” असं सुशीला गवई सांगतात.
advertisement
सुरुवातीला वाईट वाटलं
या अनाथाश्रमात गेल्या काही वर्षांपासून छाया वरेकर या सुद्धा काम करत आहेत. “मला कामाची गरज होती तेव्हा माझ्या मैत्रिणीने आश्रमाबाबत माहिती दिली. लहान मुलांची काळजी घेण्याचं काम होतं. मला इथं संधी मिळाली. पहिल्या दिवशी मी इथे आले तेव्हा माझी नाईट शिफ्ट होती. मी माझ्या दोन वर्षाचा मुलाला घरी ठेवून आले होते. या मुलांना बघून सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं. थोडी भीती पण वाटली की हे काम जमणार का? पण आता हे काम खूप छान पद्धतीने मी करते. आता ही बाळं सतत माझ्या मागे आई म्हणून फिरत असतात. त्यामुळे माझं मन इथंच रमतं,” असं वरेकर सांगतात.
advertisement
दरम्यान, सुशीला गवई आणि छाया वरेकर या पोटच्या मुलांप्रमाणे या अनाथ बालकांचा सांभाळ करतात. काही मुलं अगदी नवजात आणि काही महिन्यांची असतात तेव्हापासून त्यांची सर्व काम स्वत:च्या मुलाप्रमाणं या ‘आई’ करत असतात. तसेच हे काम खूप आनंददायी आणि अभिमानास्पद असल्याचंही त्या सांगतात.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 01, 2024 5:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अनाथ आश्रमातील लहानग्यांवर जीव लावणाऱ्या 'यशोदा', मायेची पाखर घालतात या आई

