छ. संभाजीनगरात जागते रहो! नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाणं केलं बंद; शाळांनाही सुट्टी, नेमकं काय घडलं?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, यामुळे येथील नागरिक सध्या चांगलेच दहशतीमध्ये आहेत.
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एका बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरात फिरणारा हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये पाच ते सहा वेळेस दिसला. प्रत्यक्षात मात्र बिबट्या काही हाती लागत नाहीये. जवळपास शंभर कर्मचारी रात्रंदिवस जागता पहारा देत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख मॉल परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तर काही भागात शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरीमध्ये तीन दिवसांपूर्वी दिसलेल्या बिबट्यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळं त्या परिसरात असलेल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. वनविभाग आणि स्थानिक पोलिसांच्या 100 जणांच्या टीमकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या याच परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. तर गुरुवारी हा बिबट्या प्रोझोन मॉल परिसरामध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे उल्कानगरीत सोमवारपासून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. वन विभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी शहरात एकूण पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे.
advertisement
नाशिक येथील ४, जुन्नर येथील ११ वनरक्षक कर्मचाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर येथील ९० कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. बुधवारी वन विभागाने उल्कानगरीपासून ते पैठण रोडवरील बेस्ट प्राइसपर्यंत बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या असल्याचा कोणताही सुगावा आढळला नाही. झाडाझुडपांत पिंजरा ठेवला असून भक्ष्य म्हणून त्यात शेळी ठेवली आहे. याशिवाय बिबट्याला जाळे लावून पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अजूनही या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 19, 2024 7:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरात जागते रहो! नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाणं केलं बंद; शाळांनाही सुट्टी, नेमकं काय घडलं?