रामोशी समाजातील युवकांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, २ लाखांचं विना तारण कर्ज तसेच उद्योगासाठी १५ लाख!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
CM Devendra Fadanvis: आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
पुरंदर (पुणे) : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले, आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, आमदार विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, दौलत शितोळे, अंकुश जाधव, मोहन मदने आदी उपस्थित होते.
advertisement
इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज, तर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
advertisement
ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने ओबीसी मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, ४२ वसतिगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले, त्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे, हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रामोशी समाजातील युवकांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, २ लाखांचं विना तारण कर्ज तसेच उद्योगासाठी १५ लाख!