डॉक्टरच्या चुकीमुळे हसता-खेळता संसार उद्ध्वस्त! पत्नीला वाचवण्यासाठी पतीने घर-दार विकलं, २०३ दिवसांपासून ती मृत्यूच्या दारात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. मोहंमद इब्राहिम सौदागर यांनी चुकीची ॲलोपॅथी औषधं दिल्याने रईसा खान गंभीर अवस्थेत असून, बावा खान यांनी उपचारासाठी १५ ते १६ लाख खर्च केले. गुन्हा दाखल.
एका डॉक्टरने चुकीची औषधं दिली आणि ती थेट महिलेच्या जीवावर बेतली आहेत. आज ती महिला जण्यासाठी संघर्ष करत आहे. एका डॉक्टरने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलेल्या चुकीच्या औषधांमुळे २८ वर्षीय महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. गेल्या २०३ दिवसांपासून ही महिला मृत्यूशी झुंज देत असून, तिच्या उपचारासाठी पतीने आपले घरदार, प्लॉट आणि वाहने विकून तब्बल १५ ते १६ लाख रुपये खर्च केला. या प्रकरणी शहर चौक पोलीस ठाण्यात डॉ. मोहंमद इब्राहिम सौदागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय?
तक्रारदार बावा खान मियाँ खान यांची पत्नी रईसा खान हिला १२ जून २०२५ रोजी डोळ्यांचा त्रास होत होता. शहाबाजार परिसरातील दवाखान्यात जात असताना, रईसा वरच्या मजल्यावर असलेल्या 'अश-शिफा चॅरिटेबल क्लिनिक' मध्ये गेली. तिथे डॉ. मोहंमद इब्राहिम सौदागर यांनी तिला तपासून तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवण्याऐवजी स्वतःच काही 'हाय-डोस' ॲलोपॅथी गोळ्या लिहून दिल्या.
advertisement
गोळ्यांच्या दुष्परिणामाने चेहरा विद्रूप
या गोळ्या घेतल्यावर अवघ्या दोनच दिवसांत रईसाच्या शरीरावर त्याचे भयंकर दुष्परिणाम झाले. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला असून चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. प्रकृती वेगाने खालावल्याने तिला १६ जून २०२५ रोजी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ती व्हेंटिलेटरवर असून तिला स्वतःहून श्वास घेणे किंवा अन्न घेणंही कठीण झालं.
advertisement
वैद्यकीय समितीचा अहवाल ठरला निर्णायक
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या समितीने चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपी डॉ. सौदागर हे BUMS (युनानी) डॉक्टर असून त्यांना ॲलोपॅथी औषधे देण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नाही. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक ही औषधे दिल्याने महिलेचा जीव धोक्यात आल्याचा स्पष्ट अभिप्राय समितीने दिला, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
उपचारासाठी संसार उघड्यावर
view commentsपत्नीला वाचवण्यासाठी पती बावा खान यांनी जंगजंग पछाडले आहे. उपचाराचा प्रचंड खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपला राहता प्लॉट, दुचाकी आणि इतर मालमत्ता विकली आहे. १५ ते १६ लाखांचा खर्च करूनही पत्नीची प्रकृती अद्याप गंभीर असल्याने हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. एका डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या गोळ्यांमुळे महिलेचा जीव धोक्यात आला आहे. आयुष्याची झुंज देत आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टरच्या चुकीमुळे हसता-खेळता संसार उद्ध्वस्त! पत्नीला वाचवण्यासाठी पतीने घर-दार विकलं, २०३ दिवसांपासून ती मृत्यूच्या दारात










