Chandrapur: निर्ढावलेल्या शासकीय यंत्रणेचा बळी, हक्काच्या तुकड्यासाठी 55 वर्षांच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:Sachin S
Last Updated:
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात 26 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता.
हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर : सरकारी काम तीन महिने थांब...हे शासकीय कामाबद्दल नेहमी म्हटलं जातं. राजकीय पुढारी कितीही भाषणबाजी करत असले तरी वास्तव्यात शासकीय कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. आपल्या हक्काची जमीन नावावर करण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही जमीन काही नावावर झालीच नाही. अखेरीस तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या 55 वर्षांच्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात 26 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. परमेश्वर मेश्राम (55) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. परमेश्वर मेश्रााम यांनी २६ सप्टेंबरला तहसील कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज परमेश्वर मेश्राम यांचा मृत्यू झाला. मेश्राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जमिनीचा फेरफार जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही आणि शेतीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे.
advertisement
तहसीलदार निलंबित
भद्रावती तालुक्यातील कुरोडा गाव शिवारात परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन आहे. या जमिनीबाबत कोर्टात केस सुरू होती. मात्र, अलीकडेच या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागला. पण तरीही गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली आहे.
Location :
Chandrapur,Chandrapur,Maharashtra
First Published :
October 06, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrapur: निर्ढावलेल्या शासकीय यंत्रणेचा बळी, हक्काच्या तुकड्यासाठी 55 वर्षांच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू