'बाबा मी आयुष्य संपवतोय....' एक मिनिटाचा कॉल अन् आयुष्याचा शेवट, 9 वर्षांचा मुलगा झाला पोरका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोंदिया येथील अर्जुनी मोरगावमध्ये कर्जबाजारीपणामुळे संदीप नाकाडे याने मालवाहू रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गोंदिया : "बाबा... मी आयुष्य संपवतोय, हे शब्द शेवटचे ठरले, बापानं पुढे प्रश्न केला पण तो ऐकण्यासाठी देखील थांबला नाही, अचानक फोन बंद झाला आणि एक मिनिटांच्या फोननं बापाचं काळीज हादरलं. तर पुढच्याच क्षणी तरुणानं आपलं आयुष्य संपवलं होतं. फोनवर मुलाचे हे शब्द ऐकले आणि ६७ वर्षांच्या वसंता नाकाडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाने आपली गंमत केली असावी, असं समजून ते पुढे काही बोलणार इतक्यात पलीकडून फोन कट झाला आणि काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं.
कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे मानसिक तणावात असलेल्या ४० वर्षीय विवाहित तरुणाने मालवाहू रेल्वेखाली उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. एका बापानं आपल्या मुलाला गमावलं तर ९ वर्षांच्या पोराचं छत्र हरपलं. या घटनेमुळे नऊ वर्षांचा मुलगा पोरका झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाच्या पश्चात त्याची पत्नी, मुलगा आणि वडील आहेत. कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही धक्कादायक घटना गोंदियातील अर्जुनी मोरगाव परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
शेती आणि व्यवसायाचा डोलारा कोलमडला
मिळालेल्या माहितीनुसार, ताडगावच्या संदीप नाकाडे हा वसंता नाकाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांची शेती सांभाळून संदीपने स्थानिक जुन्या बस स्थानक परिसरात वक्रतुंड कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं. मात्र, व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसल्याने आणि बँकांचे कर्ज कसं फेडायचं या विचारानं त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती. तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. वडिलांची जमीन बँकेत गहाण ठेवून त्याने कर्ज घेतले होतं, मात्र त्याची परतफेड करताना त्याची ओढाताण होत होती.
advertisement
वडिलांना केला शेवटचा फोन
सकाळी वडील शेतातून काम करून घरी परतले होते. सकाळी ९.५५ च्या सुमारास संदीपने वडिलांना फोन लावला. "बाबा, मी आयुष्य संपवतोय," असं तो शांत स्वरात म्हणाला. वडिलांना सुरुवातीला विश्वास बसला नाही, त्यांनी "अरे असं का करतोस? माझी गंमत तर करत नाही ना?" असं विचारलं, पण संदीपने काहीही उत्तर न देता फोन बंद केला. हाच तो एक मिनिटाचा शेवटचा कॉल ठरला, ज्याने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला.
advertisement
क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं
वडिलांशी बोलणं झाल्यावर संदीपने रेल्वे स्थानक गाठलं. त्याच वेळी गोंदियाकडून चंद्रपूरच्या दिशेने जाणारी एक मालवाहू रेल्वे स्थानकावरून जात होती. मनात कर्जाचं आणि अपयशाचं शल्य घेऊन संदीपने क्षणाचाही विचार न करता भरधाव रेल्वेसमोर उडी घेतली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या मुलाने म्हातारपणी आपला आधार व्हावे, असं वडिलांना वाटत होतं, त्याच मुलाला आता शेवटचा निरोप देण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.
advertisement
नऊ वर्षांच्या मुलाचा आधार हरपला
view commentsसंदीपच्या मागे वृद्ध वडील, पत्नी आणि नऊ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. वडिलांच्या आत्महत्येने चिमुकल्या मुलाचे छत्र हरपले असून नाकाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मर्ग नोंदवला असून, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नलावडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Gondiya (Gondia),Gondiya,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बाबा मी आयुष्य संपवतोय....' एक मिनिटाचा कॉल अन् आयुष्याचा शेवट, 9 वर्षांचा मुलगा झाला पोरका










