कुठे राडा तर कुठे मतदारांनाचं डांबलं, राज्यात निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; काय - काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिलांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
मुंबई : महाराष्ट्रातील 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान झालं. या मतदानावेळी काही नगरपरिषदांमध्ये पैसे वाटप आणि बोगस मतदारांवरुन चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. धर्माबाद, अंबरनाथ, कोपरगाव या ठिकाणी वाद झालेले पाहायला मिळाले.
कोर्टाच्या निर्णयानुसार शनिवारी राज्यातील 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानावेळी काही ठिकाणी चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसलं. नांदेडच्या धर्माबादमध्ये दोन ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिलांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये मिळणार असल्याचं सांगत, रोखून धरल्याचा आरोप महिलांनी केला.
advertisement
धर्माबादमध्ये मतदारांना डांबलं
एकीकडे मतदारांना डांबून ठेवलं जात असतानाच, काही तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप केला गेला. अशाच बोगस मतदान केल्याच्या आरोपातुन एका महिला, आणि पुरुषाला जमावाकडून चोप दिला गेला. मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमल्यानं, अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पण, या प्रकारामुळे धर्माबादमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
advertisement
अंबरनाथमध्ये सौम्य लाठीचार्ज
इकडे अंबरनाथमध्येही सकाळपासूनच पैसे वाटपाच्या आरोपांची राळ उठल्याचं दिसलं. मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटपाच्या आरोपावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले. यावेळी पोलिसांना तणाव निवळण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
200 संशयित महिलांनी केलं बोगस मतदान
त्याचवेळी काँग्रेस आणि भाजपनं भिवंडीहून 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा गंभीर आरोप केल्यानं खळबळ माजली. या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप केला गेला. हा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं फेटाळला. इकडे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जेपी हार्मोनियम सोसायटीत पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर भरारी पथकानं येऊन हे पैसे ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याचं दिसलं.
advertisement
उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्यानं गोंधळ
अहिल्यानगरच्या कोपरगावामध्येही एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून दूर नेल्यानं वाद टळला. 24 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं मतदान मतदान यंत्रात बंद झालंय.. त्यामुळं प्रामुख्यानं नांदेडच्या धर्माबाद आणि ठाण्याच्या अंबरनाथमध्ये झालेल्या या गोंधळात मतदानावर काय परिणाम झाला.. हे रविवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 8:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुठे राडा तर कुठे मतदारांनाचं डांबलं, राज्यात निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; काय - काय घडलं?










