कोकाटेंचा पत्ता कट, कृषी मंत्रीपदासाठी भुजबळ रेसमध्ये पण दादांनी फिरवला गेम, इनसाईड स्टोरी

Last Updated:

माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा असताना धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि मकरंद पाटील यांच्या नावाची चर्चा असताना अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी का दिली?

News18
News18
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. तो म्हणजे तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे सभागृहात बसून रमी ऑनलाईन गेम खेळताना आढळले. राज्यात सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कृषी मंत्री रमी गेममध्ये मग्न झाल्याचं पाहून अनेक ठिकाणी कोकाटेंविरोधात रोष बघायला मिळाला. अनेकांनी रस्त्यावर पत्ते खेळत कोकाटेंचा निषेध केला. विधिमंडळातला रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा होऊ लागली.

मुंडे आणि भुजबळ रेसमध्ये

याचबरोबर कोकाटेंचं कृषीमंत्रीपद गेलं, तर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार? याबद्दलही अनेक अंदाज लावले जाऊ लागले. यानंतर सर्वात आधी तीन नावं चर्चेत आली. पहिलं नाव म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरं धनंजय मुंडे आणि तिसरं नाव मकरंद आबा पाटील. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या धनंजय मुंडे यांना पुन्हा कॅबिनेटमध्ये घेतलं आणि त्यांच्याकडे थेट लोकांशी संपर्क असणारं कृषी खातं दिलं तर ही बाब राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीची ठरली असती, त्यामुळे इथून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं सांगितलं जातं.
advertisement

अजित पवारांनी गेम फिरवला?

अशात राष्ट्रवादीतील सर्वात सिनीअर नेता म्हणून छगन भुजबळ आणि मकरंद पाटील दोघे रेसमध्ये आले. या पदासाठी अजित पवारांची पहिली पसंती मकरंद पाटील यांना होती. मात्र मकरंद पाटील यांच्याकडे कृषीखातं दिलं तर त्यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांना द्यावं लागलं असतं. अशात कृषीखातं काढून कोकाटे यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं दिलं तर, ते राष्ट्रवादीसाठी पुन्हा अडचणीचं ठरलं असतं. कारण हे खातं कृषी खात्याइतकं महत्त्वाचं नसलं तरी थेट लोकांशी संपर्क येणारं हे खातं आहे. अशात आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कोकाटेंना हे खातं दिलं, तर राष्ट्रवादीसाठी ही खांदेपालट मागचे पाढे पंचावन्न अशीच राहिली असती. तसेच हे कृषी खातं घ्यायला मकरंद पाटील यांनी स्वत: विनम्र नकार दिल्याचं देखील सांगितलं जातंय. त्यामुळे हा पर्यायही मागे पडला.
advertisement
अशात छगन भुजबळ एकटेच रेसमध्ये राहिले होते. त्यांच्याकडे कृषीमंत्री दिलं जाऊ शकतं, अशी चर्चाही झाली. पण कोकाटेंचा पत्ता कट झाल्यानंतर कसल्याप्रकारे चर्चेत नसलेल्या दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे अजित पवारांनी ऐनवेळी गेम फिरवल्याचं सांगितलं जातंय.

दत्तात्रय भरणे यांच्याकडेच कृषीमंत्री का दिलं?

आता दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं देण्यामागे अजित पवारांची खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, सर्वात सिनीयर नेता म्हणून थेट लोकांशी संपर्क असलेल्या कृषी खात्यावर भुजबळांचा पहिला दावा होता. मात्र अजित पवारांनी त्यांना डावलून हे खातं भरणे यांना दिलं. दत्तात्रय भरणे हे बारामती शेजारी असलेल्या इंदापूरचे आमदार. ते अजित पवारांचे विश्वासू देखील मानले जातात. त्यामुळे अजित पवारांनी कृषी मंत्रीपदाची माळ भरणे यांच्या गळ्यात टाकल्याचं बोललं जातंय.
advertisement

अजित पवारांनी कोणते डाव साधले?

यातून अजित पवारांनी दोन डाव साधल्याची चर्चा आहे. पहिला डाव म्हणजे छगन भुजबळांचं वर्चस्व रोखणं. खरं तर, ज्यावेळी पहिल्यांदा महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला होता. तेव्हा भुजबळांना डावलण्यात आलं होतं. आगामी काळात भुजबळ पक्षात वरचढ ठरू शकतात, ही बाब लक्षात घेऊन त्यांचा पत्ता कट झाल्याची तेव्हा चर्चा झाली. पण जेव्हा धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं, तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने हे पद भुजबळांना मिळालं, अशा चर्चा आहेत.
advertisement
अशात कृषी मंत्रीपद भुजबळांकडे गेलं, तर ते पुन्हा पक्षात आपलं बळ वाढवू शकतात, हीच बाब लक्षात घेऊन अजित पवारांनी ऐनवेळी गेम फिरवला आणि कृषीमंत्री पदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिली. यातून साधलेला दुसरा डाव म्हणजे अजित पवारांनी कृषीमंत्रीपद भरणे यांना देऊन अप्रत्यक्षपणे त्या पदावर स्वत:चा होल्ड ठेवला आहे. तसेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे देऊन पक्षातील नाराजी उफाळणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतल्याचं सांगितलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोकाटेंचा पत्ता कट, कृषी मंत्रीपदासाठी भुजबळ रेसमध्ये पण दादांनी फिरवला गेम, इनसाईड स्टोरी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement