'साहेब, माझी बायको हरवली', पतीच निघाला खूनी, पत्नीसोबत केलेला कांड पाहून पोलीसही हादरले!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Wardha: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची दृश्यम स्टाईल हत्या केली आहे.
हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची दृश्यम स्टाईल हत्या केली आहे. त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराजवळच पुरला होता. आरोपीनं हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी त्याने चक्क पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचं बिंग फोडत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.
माधुरी वैद्य असं हत्या झालेल्या मृत महिलेचं नाव आहे. तर सुभाष वैद्य असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. मृत माधुरी घटस्फोटीत होती आणि सुभाष वैद्य याने तिला फसवून तिच्याशी विवाह केला होता. आता त्याने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नेमकं कोणत्या कारणातून पत्नीला संपवलं, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून माधुरीच्या माहेरचे लोक तिला फोन करत होते. मात्र माधुरी फोन उचलत नव्हती. त्यानंतर तिचा फोनही बंद लागत होता. यानंतर नातेवाईकांनी सुभाषला फोन केला असता, तोही माधुरीशी बोलणं करून देत नव्हता. माधुरीबद्दल विचारलं असता, तो नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्यामुळे माधुरी कुठे आहे? तिच्यासोबत काय घडलं? याचा काहीच थांगपत्ता नातेवाईकांना नव्हता.
advertisement
दरम्यान, सुभाषने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मात्र त्याचा फोन बंद लागला. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी थेट आरोपीच्या हिंगणघाट येथील घरावर धाड टाकली. घरी येताच पोलिसांना परिसरात दुर्गंधी जाणवत असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. घराभोवती नाफ्थलीनच्या गोळ्या टाकलेल्या दिसल्या आणि एका ठिकाणी माती ताजी खणलेली दिसली. संशय बळावताच पोलिसांनी ती जागा खोदून पाहिली असता, तिथे माधुरीचा मृतदेह आढळून आला. पत्नीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा आरोपीचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपी सुभाष वैद्य याचा कसून शोध सुरू आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 24, 2025 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'साहेब, माझी बायको हरवली', पतीच निघाला खूनी, पत्नीसोबत केलेला कांड पाहून पोलीसही हादरले!