Jalgaon Accident: गोदावरी कॉलेजजवळ भीषण अपघात; कडगावच्या तरुणाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संजयच्या निधनाने कडगाव गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव शहरालगत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत कडगाव येथील तरुण संजय पोपट पाटील (वय 24) याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गणेश बाबुराव बाविस्कर (वय 25) गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय आणि गणेश हे दोघेही दुचाकीवरून जळगाव शहरातून कडगावकडे जात होते. दरम्यान, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. यात संजय पाटील याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश बाविस्कर गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन गणेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवले.
advertisement
आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटणारा
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच संजयच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. एकुलत्या एका मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. नातेवाईक, मित्र व गावातील नागरिकांनीही रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. संजयच्या निधनाने कडगाव गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा
advertisement
घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अपघातग्रस्त वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
अचानक घडलेल्या या अपघाताने एका कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे. तरुण वयातच प्राण गमावलेल्या संजयच्या निधनाने त्याच्या मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे. गावात व रुग्णालयात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 12, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident: गोदावरी कॉलेजजवळ भीषण अपघात; कडगावच्या तरुणाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी