Loksabha Election : रक्षा खडसेंच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध, 200 जणांनी दिले सामूहिक राजीनामे, जळगावात खळबळ
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इम्तियाज अहमद, जळगाव : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून पक्षांकडून उमेदवारांची नावेही जाहीर केली जात आहेत. भाजपने महाराष्ट्रात रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलीय. मात्र रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. खासदार रक्षा खडसे या भाजप कार्यकर्त्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनात खडसे यांनी रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी आपण रक्षा खडसे यांना राष्ट्रवादीकडून ऑफर दिली होती असंही म्हटलं होतं. पण रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांना स्पष्टपणे नकार दिला होता.
भाजपने देशात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकिट कापले आहे. बहुतांश खासदारांचा पत्ता कट करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त करत राजीनामेही दिले आहेत. रविवारी तब्बल 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहेत.
advertisement
रक्षा खडसेंच्या उमेदवारीला वरणगाव शहरातून तीव्र विरोध होत आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारी विरोधात 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं की, मंत्री गिरीश महाजन यांना खडसे परिवाराकडून वारंवार टार्गेट केले जाते. मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या कडून साधे उत्तर सुद्धा दिले जात नाही. दहा वर्षांत निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.
advertisement
भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने सुरू झालेले राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बूथ प्रमुख व सुपर वॉरियर असे मिळून 200 जणांनी आपल्या पदाचे राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमोल जावळे यांच्याकडे पाठवल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ व इतर तालुक्यांमध्ये रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून तीव्र विरोध होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Loksabha Election : रक्षा खडसेंच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध, 200 जणांनी दिले सामूहिक राजीनामे, जळगावात खळबळ










