Bhusawal News : खोदकाम सुरू असताना विहीर कोसळली; भुसावळमध्ये मोठा अपघात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
खोदकाम सुरू असताना विहीर कोसळून भूसावळमध्ये मोठा अपघात झाला आहे.
भुसावळ, इम्तियाज अहमद, प्रतिनिधी : विहिरीचे खोदकाम सुरू असताना मातीचा काही भाग खचला. या घटनेत खोदकाम करणार मजूर तब्बल तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मजुराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे या मजुराचे प्राण वाचले आहेत. वरणगाव रोडवरील लकीबानगर परिसरात ही घटना घडली आहे. शशिकांत श्रीकांत तायडे असे या मजुराचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उन्हाळ्यामुळे भुसावळला पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लकीबानगरातील एका घरमालकाने रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील काही मजूर विहिरीच्या कामासाठी बोलावले होते. विहिरीतील कचरा काढण्यात आला. यानंतर विहिरीच्या निम्म्या भागावर सिमेंटचा थर लावण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे.
काम सुरू असताना मातीचा काही भाग कोसळला. त्यासोबत तायडे हेही खाली कोसळले आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले. ही घटना त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पवन भंगाळे, दिनेश पुरोहित, गजानन जावळे हे काही वेळातच घटनास्थळी पोहचले. त्यांनी ३० ते ४० फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तायडे यांना तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. यात तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Location :
Bhusawal,Jalgaon,Maharashtra
First Published :
March 31, 2024 9:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Bhusawal News : खोदकाम सुरू असताना विहीर कोसळली; भुसावळमध्ये मोठा अपघात


