मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, आईनंतर भावाचेही निधन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लहान भावाचे निधन झाले असून आईच्या निधनानंतर भावाच्या अचानक निधनाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
नितीन नांदुरकर, जळगाव, 08 नोव्हेंबर : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या दुःखातून सावरण्याआधी भावाचेही निधन झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12 वाजता मूळ गाव धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून निघणार आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील हे आज कॅबिनेटची बैठक असल्यामुळे मुंबईला होते. मात्र भावाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर ते तातडीने जळगावकडे रवाना झाले आहेत. सुनील पाटील हे मोठे भाऊ तर गुलाबराव पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. तर कैलास पाटील हे सर्वात लहान तिसऱ्या क्रमांकाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये निधन झालं. रेवाबाई पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर दोनच महिन्यांनी धाकट्या भावाच्या निधनाने गुलाबराव पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 08, 2023 8:35 AM IST









