दहावीचा पहिलाच पेपर फुटला! परीक्षा सुरू होताच 15 मिनिटात उत्तरांच्या झेरॉक्स कॉपीचा पाऊस
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
जालना : महाराष्ट्रात इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असतानाच 21 फेब्रुवारीपासून दहावी बोर्डाची परीक्षाही सुरू झाली. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. संतापजनक म्हणजे सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काहीच वेळात उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळू लागली. जालना जिल्ह्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटला.
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमधून समोर आला. दहावी हा करियरचा अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असतो. अशात हा कॉपीचा गैरप्रकार समोर येणं संतापजनक आहे. शिवाय यामुळे शासनाकडून कॉपीमुक्त परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
जालना जिल्ह्यात जवळपास 102 परीक्षा केंद्रांवर साधारण 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. धक्कादायक म्हणजे जालन्यात परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. ही गर्दी पाहून पोलीसही हादरले. शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, परंतु पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाला.
advertisement
दुसरीकडे जळगावमध्येही दहावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी पुरवल्या जात होत्या. कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा दावा केला जात होता, त्यानुसार परीक्षा केंद्रांवर मोठा बंदोबस्त असतानाही पहिल्याच दिवशी हा गैरप्रकार समोर आला.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 21, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
दहावीचा पहिलाच पेपर फुटला! परीक्षा सुरू होताच 15 मिनिटात उत्तरांच्या झेरॉक्स कॉपीचा पाऊस






