हिंदू - मुस्लिम ऐक्याची 77 वर्षांची परंपरा, जालन्यातील पहिला मानाचा गणपती
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालन्यातील नवयुवक गणेश मंडळाने 77 वर्षांपासून अनोखी परंपरा जोपासली आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांचा सहभाग असणाऱ्या या गणेश मंडळात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. जालना शहरात देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून सामाजिक संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी गर्दी होतेय. येथील नवयुवक गणेश मंडळानं आपली 77 वर्षांची अनोखी परंपरा जोपासली आहे. या मंडळात सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत या गणेश मंडळाला पहिला मान असतो.
advertisement
जालना शहरातील काद्राबाद गल्ली परिसरात हे गणेश मंडळ आहे. तब्बल 65 किलो चांदीची गणेश मूर्ती आणि गणेश मूर्तीला परिधान केलेला सोन्याचा मुकुट हे या मंडळातील गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. गणेश मंडळातील सदस्यांपैकी काही सदस्य मुस्लिम समाजाचे आहेत. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक देखावे सादर करण्याबरोबरच शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तक वाटप केले जाते. हे मंडळ दरवर्षी आपला सामाजिक सलोखा जपत असते. 2021 मध्ये 'बेटी बचाव बेटी पढाव' अभियानाअंतर्गत सादर करण्यात आलेल्या देखाव्याला राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे, असं मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आबड यांनी सांगितलं.
advertisement
विसर्जन मिरवणुकीत पहिला मान
यंदा या मंडळांनी गुजरात येथील सहारानपुर येथील हनुमंताचा देखावा सादर केला आहे. चार कर्मचारी या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असतात. तर संपूर्ण शहरभरातून मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक येत असतात. सायंकाळच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती हँडल करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी तर दोन होमगार्डची नियुक्ती केलेली असते. विसर्जन मिरवणुकीत मामा चौक येथे या गणेश मंडळाच्या मूर्तीची जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरती होते. यानंतरच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. नवरात्र उत्सवामध्ये चांदीच्या गणेश मूर्तीसाठी मंदिराच्या बांधकामाचं काम सुरू करणार असल्याचं सचिव अल्केश अग्रवाल यांनी सांगितलं.
advertisement
काय म्हणतात मुस्लिम बांधव?
"मी चार वर्षांपूर्वी जालना शहरात आलो आहे. घनसावंगी येथील सामान्य रुग्णालयात मी कार्यरत आहे. चार वर्षांपूर्वी नवयुवक गणेश मंडळा बद्दल मी ऐकलं. यानंतर या मंडळातील सदस्य आणि लोकांबरोबर चांगली ओळख झाली. मला लोकांबद्दल आस्था वाटू लागली. इथे मोठ्या प्रमाणावर सौहार्द पाहायला मिळालं. यामुळे चार वर्षांपूर्वीच मी या मंडळाचा सदस्य झालो असून दररोज गणपतीच्या आरतीला हजर असतो, असं अर्शद पटेल यांनी सांगितलं
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 12, 2024 7:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
हिंदू - मुस्लिम ऐक्याची 77 वर्षांची परंपरा, जालन्यातील पहिला मानाचा गणपती