मोबाईल नंबर चुकला, अन् खात्यात आले एक लाख... लक्षात येताच कोल्हापूरच्या रिक्षावाल्याने काय केलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
चुकून खात्यामध्ये आलेले एक लाख रुपये रिक्षाचालकाने त्याच्या मूळ खातेदाराला परत केले आहेत. कोल्हापूरच्या या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करण्यात येत आहे.
कोल्हापूर : चुकून खात्यामध्ये आलेले एक लाख रुपये रिक्षाचालकाने त्याच्या मूळ खातेदाराला परत केले आहेत. कोल्हापूरच्या या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या राजेंद्रनगर भागात राहणाऱ्या लक्ष्मण दयाप्पा शिंदे (वय 45) यांनी मोबाईल नंबरमध्ये साधर्म्य असल्यामुळे एक लाख रुपयांचं युपीआय पेमेंट वेगळ्याच मोबाईल नंबरवर केलं. हा मोबाईल नंबर रिक्षाचालक असलेल्या लहू अभिमान कांबळे यांचा होता, त्यामुळे त्यांच्या खात्यात एक लाख रुपयांची ही रक्कम जमा झाली.
लक्ष्मण शिंदे हे बांधकाम ठेकेदार आहेत. जीएसटीची रक्कम भरण्यासाठी शिंदे यांना स्वत:च्याच दोन बँक खात्यांमधील पैसे दुसऱ्या बँकेत जमा करायचे होते, यासाठी त्यांनी युपीआयचा वापर केला, पण नंबर टाकताना त्यांचा आकडा चुकला आणि एक लाख रुपये अनोळखी व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जमा झाले.
एक लाख रुपये गेल्यामुळे घाबरलेल्या लक्ष्मण शिंदे यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे यांनी अंमलदार सुप्रिया कांबळे यांना झालेल्या चुकीबद्दल माहिती दिली. यानंतर सुप्रिया कांबळे यांनी लगेचच ज्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्या क्रमांकावर फोन केला आणि अकाऊंट बॅलन्स तपासायला सांगितला.
advertisement
पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानंतर लहू कांबळे यांनी त्यांचा अकाऊंट बॅलन्स तपासला, तेव्हा त्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा झाल्याचं लक्षात आलं, याबद्दलची माहिती त्यांनी अंमलदार सुप्रिया कांबळे यांना दिली, त्यानंतर लहू कांबळे हे राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी लक्ष्मण शिंदे यांची एक लाख रुपयांची रक्कम परत केली. लहू कांबळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस स्टेशनमधल्या सगळ्या पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोबाईल नंबर चुकला, अन् खात्यात आले एक लाख... लक्षात येताच कोल्हापूरच्या रिक्षावाल्याने काय केलं?









