Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kolhapur News:क्रिकेट खेळताना घरावर उडालेला चेंडू आणायला जाणं हे १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलं. उजळवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
कोल्हापूर: क्रिकेट खेळताना घरावर उडालेला चेंडू आणायला जाणं हे १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलं आहे. घरावर असलेल्या विजेच्या तारेमुळे १३ वर्षीय मुलाने जीव गमावला. कोल्हापुरातील उजळवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अवघ्या १३ वर्षांचा अफान आसिफ बागवान हा शिक्षक आंदोलनामुळे शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खेळताना चेंडू शेजारच्या घरावर उडून गेला आणि तो आणण्यासाठी वर चढलेल्या अफानचा जीव एका क्षणात गेला.
चेंडू काढताना अफानचा हात घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारेजवळ गेला. क्षणात जबर धक्का बसला आणि अफानचा जागीच मृत्यू झाला. परिसरात या धक्कादायक घटनेची माहिती पसरताच लोकांनी अफानच्या घराकडे धाव घेतली.
advertisement
अफान हा सहावी इयत्तेत शिकत होता. वडील आसिफ बागवान रिक्षाचालक तर आई गृहिणी आहे. घरी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. अफान हा घरचा धाकटा आणि लाडका होता. त्यामुळे अचानक काळाने केलेल्या घातामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खेळाच्या नादात, निरागस चेंडू उचलण्यासाठी गेलेल्या मुलाचे आयुष्य अशा प्रकारे संपल्याने परिसरात शोक संतप्त भावना व्यक्त होत आहे.
advertisement
परिसरातील नागरिकांनी घरांच्या इतक्या जवळ उच्चदाबाच्या तारा असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. योग्य सुरक्षा अंतर न ठेवता अशा धोकादायक विजांच्या तारांचे अस्तित्व असल्याने भविष्यातही अशाच अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, अशी स्थानिकांची भावना आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
December 05, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर


