Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा कहर, पन्हाळ्यातील 2 गावं संकटात, त्या घटनेनं वाढवलं टेन्शन!
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Rain: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पन्हाळा तालुक्यात मुसळधार पावसाने नदीकाठची 2 गावे संकटात आहेत.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे. पन्हाळा तालुक्यातील माजणाळ आणि कोलोली गावांमध्ये तर पावसाने आठ दिवसांपासून थैमान घातलंय. या जोरदार पावसामुळे कासारी नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात साठलेले पाणी सोडल्याने मंगळवारी रात्री नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन झाले. यामुळे कोलोली येथील सात आणि माजणाळ येथील 11 शेतकऱ्यांचे विद्युत पंप नदीच्या पाण्यात बुडाल्या किंवा मातीखाली दबल्या गेल्या. या घटनेने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
या आपत्तीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे शेतीपंप नदीच्या खोल पाण्यात वाहून गेले किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. आज सकाळपासून गावकरी आणि स्थानिक प्रशासन यांनी मोटर्स शोधण्याचे आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, सततच्या पावसामुळे आणि नदीच्या वेगवान प्रवाहामुळे हे काम अत्यंत कठीण ठरत आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, या मोटर्सशिवाय शेतीची कामे करणे कठीण होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.स्थानिक प्रशासनाने या संकटाची तातडीने दखल घेतली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
advertisement
तहसीलदारांनी माजणाळ आणि कोलोली गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच नुकसानभरपाई आणि मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने आर्थिक सहाय्य आणि नवीन मोटर्ससाठी अनुदानाची मागणी केली आहे. तसेच, कासारी नदीच्या काठावर वारंवार होणाऱ्या भूस्खलनाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
प्रशासनाने नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या आपत्तीमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले. “आमच्या मोटर्स गेल्या, आता शेती कशी करायची?” अशी खंत माजणाळ येथील शेतकरी रमेश पाटील यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 29, 2025 8:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा कहर, पन्हाळ्यातील 2 गावं संकटात, त्या घटनेनं वाढवलं टेन्शन!









