लालबागचा राजाकडून अतिवृष्टीबाधितांना 'एक हात मदतीचा', पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंडळाकडून 50 लाखांची मदत जाहीर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील लोकप्रिय गणेश मंडळ असलेल्या 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे.
महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी सरकार शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले. महाराष्ट्रातल्या अनेक भागांना मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अनेकांचे संसार, गुरं- ढोरं तर काहींचे स्वप्नही पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना भेट देत लवकरात लवकर मदत मिळेल, असे आश्वासन दिले आहे. अनेक शेतकरी तर मंत्र्यांसमोरच टाहो फोडून रडताना पाहायला मिळाले. आता अशातच या शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील लोकप्रिय गणेश मंडळ असलेल्या 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने पूरग्रस्त शेतकऱ्यांना 'एक हात मदतीचा' दिला आहे. या वाईट आणि कठीण काळामध्ये तुम्ही एकटे नसून आम्हीही तुमच्या सोबत असल्याचे गणेश मंडळाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आस्मानी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीही पळवलंय. अनेकांच्या घराची नासधूस झालेली असताना अतिवृष्टीबाधितांसाठी लालबागच्या राजा मंडळाने 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी आशा सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
advertisement
मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला तेथील शेतकरी आणि नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा मंडळातर्फे या अतिवृष्टीबाधितांसाठी ५० लाख रूपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टीबाधितांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'च्या माध्यमातून सरकारकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार- खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार शिवाय भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकार्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. शिवाय, बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला.
Location :
Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लालबागचा राजाकडून अतिवृष्टीबाधितांना 'एक हात मदतीचा', पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंडळाकडून 50 लाखांची मदत जाहीर