Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pune Municipal Election Voter List : मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषदेत केला.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: महापालिका निवडणुका जवळ येत असताना पुण्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीने भाजपवर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. वोटचोरीचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे पुण्यातील प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं दिसू लागले आहेत. महाविकास आघाडीने आज निवडणूक प्रक्रियेतील मोठ्या गैरकारभाराचा मुद्दा समोर आणला आहे. मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीचे नेत्यांसोबत अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट सीसीटीव्ही फूटेज दाखवले. भाजपचे कार्यकर्ते थेट पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात गेले आणि तिथे ठेवलेल्या मतदार याद्या चाळल्या, बदल केल्या आणि अनेक नावांची फेरफार केल्याचा आरोप मविआ नेत्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही दाखवले. या व्हिडीओत भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयाच्या एका बंद खोलीत तासन्तास बसलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला. भाजप कार्यकर्ते तब्बल 4 तास 30 मिनिटे आत बसून मतदार यादीत बदल करत होते, आणि याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मविआ नेत्यांनी केला.
advertisement
काँग्रेसचे नेते संजय बालगुडे यांनी सांगितले की, ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठी मतदार यादी जाहीर झाल्या आहेत त्यात घोळ झाले आहेत. निवडणुकी आधी सगळे कागदपत्र गुप्त ठेवावे लागतात. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी सगळ्या याद्या बदलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजप पदाधिकारी जिथे या मतदार याद्या ठेवले आहेत तिथे जाऊन त्या मतदार याद्या चालताना आढळून आले आहेत. ज्या रूममध्ये या प्रारूप याद्या होत्या. त्या खोल्या बंद करून याद्या बदलत होते. सगळे व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत. भाजपचे कार्यकर्ते आपल्या मर्जीनुसार याद्या बदलत होते, हे सगळं सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
भवानी पेठेत असणाऱ्या कार्यालयात हा घोळ झाला आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी अस केलं आहे. सलग ४.३० तास ही लोक मतदारयादी ठेवलेल्या ठिकाणी होते. मतदार यादी प्रकाशित होण्याच्या २० दिवसांपासून आधीच हे सगळं सुरू होतं असा आरोपही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यात राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोग याकडे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गंभीर आरोप पुढील काही दिवसांत मोठा वाद निर्माण करण्याची चिन्हे आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 12:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ


