Maharashtra Election : एकाच मतदारसंघात दोन विद्यमान आमदार आमने-सामने, माजी मंत्री अन् माजी खासदारही रिंगणात
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Assembly Election : राज्यातला पहिला मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा इथं दोन विद्यमान आमदार आमने सामने आहेत. याशिवाय माजी मंत्री आणि माजी खासदारही रिंगणात उतरले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघार कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. महायुती आणि मविआत अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या कालावधीत नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षांकडून केला जात आहे. राज्यातला पहिला मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा इथं दोन विद्यमान आमदार आमने सामने आहेत. याशिवाय माजी मंत्री आणि माजी खासदारही रिंगणात उतरले आहेत. यामुळे या मतदारसंघातली लढत रंगतदार होणार आहे.
२०१९च्या निवडणुकीत जिंकलेल्या केसी पाडवी यांना काँग्रेसने पुन्हा एकदा अक्कलकुवा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेनं आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिलीय. केसी पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून सात वेळा विजयी झाले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. यामुळे केसी पाडवी यांचं या मतदारसंघात पारडं जड मानलं जात आहे.
advertisement
दरम्यान, केसी पाडवी यांच्या विरोधात शिवसेनेनं आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिलीय. आमश्या पाडवी हे गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त २ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर आमश्या पाडवी यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. आता त्यांनाच शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं अक्कलकुवा मतदारसंघात दोन विद्यमान आमदारांमध्ये लढत होत आहे.
माजी मंत्र्याची उमेदवारी
विद्यमान आमदारांशिवाय या मतदारसंघात माजी मंत्री आणि माजी खासदारसुद्धा रिंगणात आहेत. माजी मंत्री पद्माकर वाळवी यांनी भारत आदिवासी पार्टीकडून अर्ज दाखल केला आहे. पद्माकर वाळवी हे ३ वेळा आमदार होते. आठ महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश केला होता. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ते इच्छुक होते पण त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने भारत आदिवासी पक्षाकडून त्यांनी अर्ज दाखल केलाय.
advertisement
भाजपच्या हिना गावित मैदानात
view commentsमाजी खासदार डॉक्टर हिना गावित या भाजपकडून इच्छुक होत्या. त्यांना भाजपकडून अर्ज भरला होता पण एबी फॉर्म नसल्याने तो अवैध ठरला. तरीही हिना गावित यांनी अपक्ष अर्जही दाखल केला आहे. तो वैध ठरला असल्याने त्या अद्याप रिंगणात आहेत. आता भाजप त्यांची समजूत काढणार का? ४ नोव्हेंबरपर्यंत हिना गावित माघार घेणार का हे पाहावं लागेल. जर त्यांनी माघार घेतली नाही तर अक्कलकुवा मतदारसंघात दोन विद्यमान आमदार, माजी मंत्री आणि माजी खासदार यांच्यात चौरंगी लढत बघायला मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2024 10:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : एकाच मतदारसंघात दोन विद्यमान आमदार आमने-सामने, माजी मंत्री अन् माजी खासदारही रिंगणात








