दिवसाला 10 तास काम! खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
महाराष्ट्र सरकारने कामकाजाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. या प्रस्तावामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आजकाल खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास नऊ तासांहून अधिक असतात, मात्र त्यांना त्याबद्दल योग्य मोबदला मिळत नाही, अशी तक्रार वेळोवेळी समोर येते. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कामकाजाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. या प्रस्तावामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 करण्याचा विचार
राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सरकार दैनंदिन कामाचे कमाल तास नऊवरून दहा करण्याचा विचार करत आहे. हा प्रस्ताव नुकताच मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने सादर केला असून त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
कोणत्या कायद्यात बदल होणार?
हा प्रस्ताव अमलात आणण्यासाठी महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगार नियमन आणि सेवा अटी) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करावी लागणार आहे. सध्या हा कायदा राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आणि विविध खासगी व्यवसायांसाठी कामाचे तास आणि सेवा अटी ठरवतो. सरकारच्या मते, या सुधारणा आंतरराष्ट्रीय कामगार नियमांच्या अनुरूप असतील आणि कार्यस्थळांना अधिक लवचिकता देतील.
advertisement
महत्त्वाचे बदल कोणते?
ओव्हरटाइम तास वाढणार: सध्या तीन महिन्यांत 125 तास ओव्हरटाइमची मर्यादा आहे, ती वाढवून 144 तास करण्याचा विचार आहे.
कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अनिवार्य ब्रेकची तरतूद होऊ शकते.
नव्या कामगार संहितेनंतर महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची संधी देण्याचा विचार आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.
सध्या 10 कर्मचाऱ्यांपर्यंतची आस्थापने या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत, मात्र नवीन प्रस्तावानुसार 20 कर्मचाऱ्यांपर्यंतची आस्थापने यात समाविष्ट केली जातील.
advertisement
फुंडकर यांनी स्पष्ट केलं की हा विषय अद्याप चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. अनेक खासगी संस्थांमध्ये आधीच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त तास काम करवून घेतलं जातं आणि त्यासाठी योग्य मोबदला दिला जात नाही, हे पाहता सरकारने हा पुनर्विचार सुरू केला आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झालेला नाही आणि पुढील चर्चेनंतरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवसाला 10 तास काम! खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी? जाणून घ्या संपूर्ण माहिती


