LPG Crisis: ''LPG सिलिंडर हवं असेल तर मला सांगा'', जैन समुदायासाठी आवाहन! पत्रावरून मंत्री लोढा पुन्हा वादात
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Sumit Sawant
Last Updated:
Mangal Prabhat Lodha : जैन समुदायाला गॅस सिलिंडरची आवश्यकता असल्यास तातडीने कळवावे, अशा आशयाचे त्यांचे पत्र समोर आले आहे. त्यामुळे देशातील सगळे नागरिक त्रस्त असताना एका विशिष्ट समुदायाला मंत्री लोढा झुकतं माप देत असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानं आखातामध्ये सध्या युद्ध पेटलं आहे. जवळपास २९ दिवसानंतरही युद्धाची धग कमी झाली नाही. या युद्धाचा परिणाम भारतातील स्वयंपाकघरावरही झाला आहे. भारतात एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही एलपीजी मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका पत्रामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जैन समुदायाला गॅस सिलिंडरची आवश्यकता असल्यास तातडीने कळवावे, अशा आशयाचे त्यांचे पत्र समोर आले आहे. त्यामुळे देशातील सगळे नागरिक त्रस्त असताना एका विशिष्ट समुदायाला मंत्री लोढा झुकतं माप देत असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मतदारसंघातील जैन समुदायासाठी एक विशेष पत्र प्रसिद्ध केले आहे. मात्र, केवळ एका विशिष्ट समुदायाला मदतीचे आवाहन केल्यामुळे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात भाषिक आणि जातीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रातील मजकूर काय?
२८ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान, जैन धर्मीयांचा 'आंबील की ओली' हा सण येत आहे. या सणादरम्यान भाविकांना अन्नासाठी आणि धार्मिक विधींसाठी गॅसची कमतरता भासू नये, या उद्देशाने लोढा यांनी जैन संस्था आणि सोसायट्यांना हे पत्र लिहिले आहे. "जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे.
advertisement
वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे
मुंबईत सध्या मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना, मंत्र्यांनी केवळ एका ठराविक समुदायासाठी मदतीचा हात पुढे केल्याने इतर समाजघटकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. "मंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात की केवळ एका समाजाचे?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. लहान-मोठे हॉटेल्स एलपीजी अभावी बंद पडत असताना मंत्री लोढा हे एका विशिष्ट समाजघटकाला एलपीजी कुठून उपलब्ध करून देणार, त्यांना सिलिंडर उपलब्ध करून देत असतील तर सामान्य लोक, लहान-मोठी हॉटेल्स, चहाची टपरी चालवणाऱ्यांसाठी एलपीजी उपलब्ध का नाहीत, असा सूरही उमटत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
LPG Crisis: ''LPG सिलिंडर हवं असेल तर मला सांगा'', जैन समुदायासाठी आवाहन! पत्रावरून मंत्री लोढा पुन्हा वादात









