Maratha Reservation Protest Live Updates: मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी आझाद मैदानात अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, जरांगेंच्या आंदोलनाला सरकारने फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती. आता या आंदोलनाची परवानगी आणखी वाढवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबई, बोरीबंदरचा परिसर गजबजून गेला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आजदेखील काही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
Maratha Reservation: मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून 3 टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाला आहे. मात्र आंदोलन ठिकाणी आंदोलकांची जेवणाची परवड होत आहेत. त्यामुळं अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत. जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेलं 3 टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे..
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांना बीड जिल्ह्यातील गावागावातून चटणी भाकरीची रसद पाठवली जात आहेत. तर या भाकरी हनुमान मंदिर , चावडी ग्रामपंचायत कार्यालय,या ठिकाणी गोळा करून वाहनाने पाठवल्या जात आहेत. गेवराई तालुक्यातील भडंगवाडी परिसरातून तब्बल पाच लाख भाकरी गोळा झाले आहेत. ट्रकने भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. CRPF, रॅपिड अॅक्शन फोर्स , राज्य राखीव दल आणि मुंबई पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. हळूहळू रस्त्यावरील आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.
Mumbai Maratha Morcha : आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj jarage Patil ) मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा…
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, या ठिकाणी असलेली गर्दी समजू नये तर वेदना समजावी. आम्हाला मुंबईतील श्रीमंत आणि गरीब सगळे जण मदत करत आहे. जे कोण महाराष्ट्रातून इकडे येत आहेत त्यांनी वाशी, मशीद बंदर आणि इतर ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावी. इथं वाहनांना जागा नाही, असेही त्यांनी सांगितलं.
जे जे जेवण वाटप करत आहेत. त्यांना सांगतो तुम्ही काय ते वाटप करत या. पण, थेट ट्रक इथे आणू नका. अन्नछत्र सुरू केले आहे त्यासाठी पैसे मागू नका. गरीबाचे पैसे खाऊ नका. रेनकोटच्या नावाखाली पैसे मागू नका असेही आवाहन त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठ्यांच्या नावाखाली पैसे जमवू नये असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता आपण उद्यापासून पाणी घेणं देखील बंद करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतील आझाद मैदानावर डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पथक उपोषणाच्या ठिकाणी आले होते.
डॉक्टरांनी जरांगे पाटील यांची वैद्यकीय चाचणी केली. रक्तदाब आणि ब्लड शुगर तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी ब्लड शुगर चाचणीस नकार दिला. तरीही डॉक्टरांनी त्यांची इतर तपासणी केली. तपासणीनंतर जरांगे पाटलांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांची ही मागणी आंदोलनातील कळीचा मुद्दा ठरला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागणीवर थेट भाष्य केले आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा…
धाराशिव: मुंबईतील मराठा आंदोलनाचे लोन गाव खेड्यापर्यंत पोहोचले असून मुंबईतील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी हे गाव गावकऱ्यांनी बंद पाळला आहे.
Maratha Reservation : मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ देऊ नका, त्यांच्या अन्न पाण्याची सोय करण्याचे आवाहन काल उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून दहा हजार आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आलीय. आझाद मैदानातील मुंब ई मराठी पत्रकार संघाच्या पार्किंगच्या जागेत याची तयारी करण्यात आलीय. शिवसेना UBT विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांना, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची माहिती –
(दिनांक 31 ऑगस्ट 2025)
१) पाणी टँकर्स –
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नका या ठिकाणी सदर टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
२) स्वच्छता –
आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात मिळून महानगरपालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अखंडपणे स्वच्छता राखली जात आहे.
आंदोलकांना देखील महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी थैल्या (डस्टबिन बॅग) मोठ्या संख्येने वितरित करण्यात येत आहेत. या थैल्यांमध्ये आंदोलकांनी कचरा टाकून तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावा, यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
३) प्रसाधनगृह –
आझाद मैदान आणि परिसरात, नियमित आणि फिरते असे मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था आंदोलकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. प्रसाधनगृहांमध्ये देखील नियमितपणे स्वच्छता केली जात आहे.
रात्री नवी मुंबईत आराम केल्यानंतर आंदोलकांनी सकाळी भाकरी, चटणी आणि ठेचा खाऊन आझाद मैदानाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आज सकाळपासूनच सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी दिसून आली.