उपोषण सोडताच मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, धायमोकलून रडले, विखे पाटलांनी समजावलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manoj Jarange Patil Emotional: इतर मागास वर्गातून अर्थात ओबीसीमधूनच मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सरकारने सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मागे घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मंजूर झाल्यानंतर आणि शासनाने तसा अध्यादेश जाहीर केल्यानंतर त्यांना मंचावरच अश्रू अनावर झाले. हा लढा सोपा नव्हता, पण मराठा समाजाच्या पाठिंब्यावर आपल्याला ऐतिहासिक लढा जिंकता आला. आधीच २ कोटी मराठ्यांना आपण आरक्षण मिळवून दिले आहे, आता सातारा गॅझेटच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील मराठेही आरक्षणातील जातील. महाराष्ट्राला मी कधीही विभागानुसार पाहत नाही. खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला मी आपले मानतो. त्यामुळेच समाज मागे पाठीशी राहिला, असे म्हणत जरांगे पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मंत्री विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांनी समाजासाठी दिलेल्या लढ्याचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
इतर मागास वर्गातून अर्थात ओबीसीमधूनच मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सरकारने सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मागे घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. वाशीच्या गुलालाची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा विखे पाटलांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी जाईन आणि अभ्यासकांनी पुन्हा काही शंका उपस्थित केली तर शासनाने शुद्धीपत्रक काढावे, अशी विनंती जरांगे यांनी केली. विखे पाटलांनी विनंती मान्य करताच आपण जिंकलो म्हणत लढ्याचा विजय जरांगे पाटील यांनी घोषित केला.
advertisement
उपोषण सोडायला फडणवीसांनी यावे... जरांगे पाटील यांची गुगली
संपूर्ण आरक्षण आंदोलनाच्या काळात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली होती. त्यांच्यावर विविध आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र उपोषण सोडण्याच्या काही मिनिटे आधी मुख्यमंत्र्यांनी उपोषण स्थळी यावे, असा आग्रह जरांगे पाटील यांनी धरला. मुख्यमंत्री जर उपोषणस्थळी आले तर त्यांचे आमचे वैर संपले, जर नाही आले तर वैर कायम राहील, असे जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
जरांगे पाटील नेमके काय म्हणाले?
शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल त्यांचे आभार, पण आमच्या मनात एक इच्छा आहे. आमचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे. जर हे सगळे उपोषण सोडवायला आले तर तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले. जर फडणवीस उपोषण सोडायला आले नाही तर माझे आणि त्यांचे वैर राहिल, असे जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज तुम्ही उपोषण सोडा. एकदा शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला भेटतील. त्यावर, उपोषण सुटल्यावर मी कुणाला जवळ येऊ देत नसतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपोषण सोडताच मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, धायमोकलून रडले, विखे पाटलांनी समजावलं









