Maratha Morcha: अंतरवालीत हजारो मराठा बांधव दाखल, कोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे मुंबईकडे कूच करणार!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maratha Morcha : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या मोर्चाच्या निर्णयावर ठाम असून आज सकाळी 10 वाजता जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे.
रवी जयस्वाल, प्रतिनिधी, जालना: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या मोर्चाच्या निर्णयावर ठाम असून आज सकाळी 10 वाजता जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना मुंबईत मोर्चा न आणण्याबाबत खडसावले होते. त्यानंतरही आज सकाळीच मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मंगळवार, रात्रीच हजारो मराठा बांधव वाहनांसह अंतरवालीत दाखल झाले.
अंतरवाली सराटीत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक दाखल झाले असून जय्यत तयारी सुरू आहे. गावातील रस्त्यांवर मराठा समाजाच्या गाड्यांची रांग लागली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून वातावरण घोषणाबाजीने दुमदुमत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनही सतर्क झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आणि कुणबी एकच असून त्याचे पुरावे, दस्ताऐवजही सापडले आहेत. त्यामुळे ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. मुंबईतील आझाद मैदानात होणारे उपोषण आंदोलन हे निर्णायक असून विजयाचा गुलाल उधळून माघारी येऊ असा निर्धार जरांगे यांनी केला. मात्र, दुसरीकडे हायकोर्टाने जरांगे यांच्या मोर्चाला मुंबईत प्रवेश नाकारला.
advertisement
पोलीस अधिकारी-जरांगेंमध्ये चर्चा...
मंगळवारी संध्याकाळी उशिरा रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे बुधवारी सकाळी मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. मात्र, त्याआधी जरांगे यांना कोर्टाने खडसावलं असून आझाद मैदानावर आंदोलनाला मनाई केली आहे. आणि जरांगे यांना काही निर्देशही दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांची पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी भेट घेऊन चर्चा केली असून कोर्टाच्या सूचनांची प्रत खांबे यांनी जरांगेंना दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून मुंबईकडे निघू नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र, जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
advertisement
मुंबईत आम्ही पोहचणारच...
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. बईतल्या आमच्या वकिल बांधवांशी बोललो आहोत. आम्हाला न्याय मिळणार आहे, परवानगी मिळणार आणि उपोषण करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दोन महिने झाले शिंदे समितीला मुदतवाढ देऊन, सात महिने झाले आता किती दिवस थांबायचं, असा सवाल त्यांनी केला. विखे पाटलांना जास्त माहित असेल समाजापेक्षा नेता मोठा नाही. त्यांना मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही. एकदा समाज मोठा करा नंतर राजकारण करा, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलं आहे. एवढ्या वेळेस माझी नाराजी सोडून द्या, चार महिने झाले तारीख डिक्लेर करून, आम्ही कधी येऊ नका, असं कधी बोललोच नाही. आम्ही कधी चर्चेला नाही, म्हणालो नाहीत. पण आता मुंबईत पोहोचणारच आहोत, असा निर्धार मनोज जरांगेंनी बोलून दाखवला.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
August 27, 2025 7:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Morcha: अंतरवालीत हजारो मराठा बांधव दाखल, कोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे मुंबईकडे कूच करणार!


