मीरा भाईंदरचा भिकारडा आमदार, त्याचे राजकारण संपविल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधव संतापले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Avinash Jadhav Mira Bhayandar Marathi Morcha: पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलेले मनसे नेते अविनाथ जाधव यांची मुक्तता केल्यानंतर दुपारी ते मोर्च्याच्या ठिकाणी आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
मीरा भाईंदर : अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी माणसांनी आपल्या अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये काढलेला मोर्चा पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांची धरपकड केली, मनसे नेते अविनाथ जाधव यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले. परंतु मराठीच्या रेट्यामुळे सरकार आणि पोलिसांना माघार घ्यायला लागल्याने मराठी माणसांचा उस्फूर्त मोर्चा संपन्न झाला. माय मराठीच्या जयघोषात हजारोंच्या गर्दीने मीरा भाईंदरमधले रस्ते फुलून गेले होते. आधी विरोधात भूमिका घेणारे परंतु मराठी माणूस खवळल्याने समर्थनार्थ भूमिका घ्यायला आलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ५० खोके एकदम ओके ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी लोकप्रिय झालेली घोषणा मोर्चात देऊन सरनाईक यांना डिवचल्याने त्यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलेले मनसे नेते अविनाथ जाधव यांची मुक्तता केल्यानंतर दुपारी ते मोर्च्याच्या ठिकाणी आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एकच जल्लोष केला. मोर्चेकऱ्यांच्या निशाण्यावर होते भाजपचे आमदार नरेंद्र मेहता...
मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने अमराठी व्यापाऱ्यांच्या गुर्मीविरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी होण्याआधीच मला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मोर्चात येण्यासाठी माझा जीव कासावीस झाला होता. सरकारी दबावापुढे न झुकता पोलिसांनी परवानगी दिली असती तर आजचा मोर्चा ५० हजार लोकांचा झाला असता, असे अविनाथ जाधव म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली.
advertisement
इथला आमदार भिकारडा, मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही
इथला भिकारडा आमदार म्हणतो की मीरा भाईंदरमध्ये १२ ते १५ टक्के लोक मराठी आहेत. मला त्याला सांगायचंय की इथे १५ टक्के असो की १८ टक्के.... आता मराठी माणूस तुझे राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही. त्याने आता मराठी माणसांच्या नादाला लागू नये, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर हल्ला चढवला.
advertisement
तर असेच अमराठी लोकांचे मोर्चे निघाले असते...
आज जर आपला मोर्चा निघाला नसता तर गेल्या आठवड्यात जसा अमराठी लोकांनी मोर्चा काढला, तसे पुढेही मोर्चे निघाले असते. परंतु मराठीची शक्ती बघितल्यानंतर आता कुणाची हिम्मत होणार नाही, असे अविनाश जाधव म्हणाले.
जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा
पोलिसांचे आभार मानतो. तुमच्यामुळे ताकद एकत्र झाली, सरकारच्या विरोधात असेज जात जा. आम्ही एकजूट होऊ. जे कुणी पोलीस दोषी असतील त्यांना निलंबित करा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर अविनाश जाधव यांनी दिली.
view commentsLocation :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
July 08, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मीरा भाईंदरचा भिकारडा आमदार, त्याचे राजकारण संपविल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधव संतापले


