ST Bus News: ५५ लाख प्रवासी अन् ६१० बसस्थानके, लालपरी तोट्यातून बाहेर येणार! काय आहे एसटीचा मेगा प्लॅन?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
ST Bus News: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी बस आता केवळ प्रवाशांची ने-आणच करणार नाही, तर महामंडळाच्या तिजोरीत महसुलाचा मोठा ओघही आणणार आहे.
मुंबई: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी बस आता केवळ प्रवाशांची ने-आणच करणार नाही, तर महामंडळाच्या तिजोरीत महसुलाचा मोठा ओघही आणणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने आता आपल्या तिजोरीत भर घालण्यासाठी मोठा मेगा प्लॅन आखला आहे. पुढील ५ वर्षात एसटीच्या तिजोरीत २५० कोटी रुपयांची भर घालण्यासाठी एसटीने नवी कल्पना समोर आणली आहे.
महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटीच्या अवाढव्य जाळ्याचा वापर करून आर्थिक सक्षमीकरण करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
advertisement
जाहिरातदारांसाठी 'सुवर्णसंधी'
पुढील पाच वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्री सरनाईक यांनी म्हटले की, "राज्यात एसटीची २५१ आगारे आणि ६१० पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. सध्या १२ हजार बसेसद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात, ही संख्या भविष्यात १ कोटींवर जाईल. 'चांद्यापासून बांद्यापर्यंत' पोहोचणाऱ्या या माध्यमावर जाहिरात देणे ही उत्पादकांसाठी मोठी संधी असल्याचेही त्यांनी म्हटले.
advertisement
उत्पन्नात दुपटीने वाढ
सध्या एसटीला जाहिरातींतून वर्षाला सुमारे २२ कोटी रुपये मिळतात. मात्र, नवीन स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमुळे हे उत्पन्न आता वर्षाला सरासरी ५० कोटींच्या घरात जाणार आहे. म्हणजेच उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे.
कुठं असणार जाहिराती?
बसच्या आतील आणि बाहेरील भागाचा वापर जाहिरातींसाठी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, बसस्थानक परिसर आणि इमारतींवरील मोकळी जागा याचाही वापर करण्यात येणार आहे. पुढील ५ वर्षांसाठीचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.
advertisement
तोट्यातून बाहेर येण्यासाठी नवा मार्ग
"केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता, जाहिरातींसारख्या पर्यायी स्रोतांतून उत्पन्न वाढल्यास एसटीला भविष्यात कधीही तोट्याचा सामना करावा लागणार नाही," असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. सध्याच्या जाहिरात परवानाधारकांचा कालावधी संपताच नवीन कंत्राटदारांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Bus News: ५५ लाख प्रवासी अन् ६१० बसस्थानके, लालपरी तोट्यातून बाहेर येणार! काय आहे एसटीचा मेगा प्लॅन?










