मुंबई विमानतळावर उतरताच संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ६ तास चौकशी, काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dr Sangram Patil Detained: केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियावर सातत्याने टिप्पणी केल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आज संग्राम पाटील यांना ताब्यात घेतले.
मुंबई: आपल्या राजकीय आणि सामाजिक मतांसाठी प्रसिद्ध असणारे आणि सरकारविरोधात मांडणी करून व्यवस्थेला जाब विचारणारे भारतीय वंशाचे लंडनस्थित डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारविरोधात सातत्याने टीकात्मक मांडणी केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आल्याचे कळते. दुसरीकडे पोलिसांकडून मात्र पाटील यांना कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, हे कळू शकलेले नाही.
केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संभाषणे केल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आज संग्राम पाटील यांना ताब्यात घेतले. मुंबईतील ना.म.जोशी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पाच ते सहा तासांपासून त्यांची चौकशी सुरू असल्याचे कळते.
गेल्या सहा तासांपासून कसून चौकशी
मुंबई सायबर पोलिस ठाण्यातील एका प्रकरणात ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र टीकात्मक मांडणी केल्यानेच त्यांची चौकशी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तूर्त अटक करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या सहा तासांपासून पोलीस अधिकारी चौकशी करीत असल्याचे त्यांच्या पत्नी नुपूर पाटील यांनी न्यूज १८ लोकमतला सांगितले.
advertisement
संग्राम पाटील यांना ताब्यात घेणे हे अन्याकारक आहे आणि छळवाद- असीम सरोदे
संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे. खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे. संग्राम पाटील हे लंडन मध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही, असे विधिज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटले.
advertisement
कोण आहेत संग्राम पाटील?
डॉ. संग्राम पाटील हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत
डॉ. पाटील हे लंडनमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करतात
कोरोना काळात अतिशय भीतीचे वातावरण असताना त्यांनी व्हिडीओतून लोकांना धीर देण्याचे काम केले
अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर संग्राम पाटील निर्भीडपणे व्यक्त होत असतात
केंद्र सरकारच्या अनेक योजना आणि निर्णयांवर संग्राम पाटील अनेकदा टीकात्मक मांडणी करतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 4:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई विमानतळावर उतरताच संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ६ तास चौकशी, काय घडलं?








