BMC : निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईकरांना झटका, मुंबई महापालिका घेणार महत्त्वाचा निर्णय, खिसा रिकामा होणार?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Water Rate Hike: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा धुराळा खाली बसताच, आता प्रशासनाने आपला मोर्चा मुंबईकरांच्या खिशाकडे वळवला आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा धुराळा खाली बसताच, आता प्रशासनाने आपला मोर्चा मुंबईकरांच्या खिशाकडे वळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांमुळे रखडलेला पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आता पुन्हा एकदा धूळ झटकून बाहेर काढण्यात आला आहे. यामुळे २०२६-२७ या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना पाणी दरवाढीच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.
किती टक्के होणार दरवाढ?
मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने पाणीपट्टी वाढीचा कच्चा मसुदा तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही प्रस्तावित वाढ सरासरी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत असू शकते. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकरच महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर मुंबईकरांच्या पाणी बिलात थेट वाढ दिसून येईल.
निवडणुकांमुळे रखडला होता निर्णय
advertisement
गेल्या दोन-तीन वर्षांत एकापाठोपाठ एक आलेल्या लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमुळे सत्ताधारी आणि प्रशासनाने दरवाढीचा कटू निर्णय लांबणीवर टाकला होता. जनतेचा रोष ओढवून न घेण्यासाठी ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता सर्व निवडणुका पार पडल्यानंतर प्रशासनाने या प्रक्रियेला वेग दिला आहे.
मुंबईकरांच्या खिशावर भार का?
advertisement
महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की, पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा खर्च, देखभाल-दुरुस्ती, नवीन जलवाहिन्यांचे जाळे आणि वाढलेली वीज बिले यांमुळे पाणीपट्टीत वाढ करणे अनिवार्य आहे. मात्र, ऐन महागाईच्या काळात ही दरवाढ लादली जात असल्याने मध्यमवर्गीय मुंबईकरांमधून संताप व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईकरांना झटका, मुंबई महापालिका घेणार महत्त्वाचा निर्णय, खिसा रिकामा होणार?








