नाशिक महापालिका सत्तास्थापनेवरुन भाजपात नाराजीचा उद्रेक! शहाराध्यक्ष सुनील केदारांनी दिला राजीनामा
- Reported by:Laxman Ghatol
- Written by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election : महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भाजपच्या गोटातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक : महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भाजपच्या गोटातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. महापौर आणि उपमहापौर पदांच्या नावांवरून सुरू असलेला अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापौर-उपमहापौर नावांवरून वाद
नाशिक महापालिकेत भाजपचे संख्याबळ प्रबळ असल्याने महापौर आणि उपमहापौर भाजपचेच होणार, हे जवळपास निश्चित होते. मात्र, या दोन्ही पदांसाठीची नावे निश्चित करताना प्रदेश पातळीवरून आलेल्या हस्तक्षेपामुळे स्थानिक नेतृत्वात नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला चर्चेत असलेली नावे ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी अडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
advertisement
अंतर्गत नाराजीचा स्फोट
महापौर आणि उपमहापौर पदांची नावे अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर नाशिक भाजपमधील अस्वस्थता उघड झाली. पक्षातील काही पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये असंतोष असल्याची चर्चा होतीच, मात्र सुनील केदार यांच्या राजीनाम्यामुळे हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रदेश नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने केदार नाराज होते. याच कारणामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
advertisement
शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव आणि त्यानंतरची प्रतिक्रिया
या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी “आम्हाला सत्तेसाठी कुणाचीही गरज नाही” असे स्पष्ट वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळेही पक्षांतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. केदार यांच्या प्रस्तावाला प्रदेश पातळीवर पाठिंबा न मिळाल्याने त्यांची नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
प्रदेश समितीकडे राजीनामा
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांनी भाजप प्रदेश समितीकडे आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पाठवला आहे. मात्र, नवीन व्यवस्था होईपर्यंत पक्षाचे कामकाज पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
भाजपसाठी आव्हानाची वेळ
नाशिक महापालिकेत सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर भाजपला अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीवरून निर्माण झालेली ही नाराजी भविष्यात पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापालिका सत्तास्थापनेवरुन भाजपात नाराजीचा उद्रेक! शहाराध्यक्ष सुनील केदारांनी दिला राजीनामा







