'या बाईसोबत मी राहणार' म्हणत नवरा बाल्कनीच्या ग्रीलवर जाऊन बसला, चौथ्या मजल्यावर हायहोल्टेज ड्रामा, LIVE VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
संतोष दळवी, प्रतिनिधी
कर्जत:  सध्या कौटुंबिक वाद आणि हिंसाचारामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. शहरी भागामध्ये नवरा आणि बायकोमध्ये गृह कलह हा विकोपाला चालला आहे. अशातच मुंबई जवळील कर्जतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. बायकोच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने घराच्या बाल्कनीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. 'या बाईनं मला खूप त्रास दिला. या बाईसाठी मी आता घरात येणार नाही' असं म्हणत या इसमाने घराच्या बाल्कनीवर चढला होता. पण, सुदैवाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या इसमाचा जीव वाचवला.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतमधील रसायनी पोलीस स्टेशनसमोर असलेल्या एका रहिवासी संकुलात हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी रात्री घडला.  राजेश पाटील असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचं नाव आहे. मध्यरात्री अचानक सोसायटीमध्ये गोंधळ सुरू झाला. राजेश पाटील हा इसम घराच्या बाल्कनीच्या ग्रीलवर जाऊन बसला होता. त्याच्या फ्लॅट हा चौथ्या मजल्यावर होता. चौथ्या मजल्याच्या बाल्कनीच्या ग्रीलवर बसून त्याने आत्महत्येची धमकी दिली. घटनेची माहिती तातडीने रसायनी पोलिसांना देण्यात आली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि  पी.एस.आय.अनुसया डोणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली होती. चौथ्या मजल्याच्या बाल्कनीच्या बाहेर एक व्यक्ती लोंबकळत होती. खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असलेला तो व्यक्ती, क्षणोक्षणी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर झुंज देत होता.
पी.एस.आय. डोणे यांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखलं आणि नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना घटनेची माहिती दिली. काही क्षणांतच बांगर यांनी संपूर्ण पोलीस पथक घटनास्थळी पाठवलं. त्याचवेळी एमआयडीसी पातळगंगा फायर ब्रिगेड टीम आणि हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनाही तातडीने मदतीसाठी पाचारण केले. त्यांनी या घटनेची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचल दलाल यांनाही कळवली.
advertisement
राजेश पाटील या इसमाचं पत्नीशी भांडण झालं होतं. दारूच्या नशेत असलेल्या राजेशनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पी.एस.आय.अनुसया डोणे यांनी प्रत्यक्ष फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शिवीगाळ करत परिस्थिती आणखी ताणू लागला.
इतक्यात पोलीस निरीक्षक संजय बांगर घटनास्थळी पोहोचले. बांगर यांनी त्या इसमाशी संवाद सुरू केला. "जीवन संपवून प्रश्न सुटत नाहीत. आपण बोलूया. तुझं दुःख समजून घेऊया." असं आवाहन त्यांनी केलं.  मात्र त्याही क्षणी त्यांच्यातला पोलीस जागा होता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये तैनात केले, हेल्प फाउंडेशन आणि फायर ब्रिगेडच्या मेंबर्सना सर्व संसाधनांसह सुरक्षित फिल्डिंग लावायला सांगून स्वतः त्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. थोड्याच वेळात त्यांनी सुरू केलेल्या संवादाला सूर गवसला. त्याचा राग ओसरला, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मृत्यूचा निर्णय बदलण्यासाठी साधलेला संवाद परिणामकारक ठरला.
advertisement
सुमारे तीन ते चार तास चाललेला तो हाय हॉल्टेज ड्रामा अखेरीस शांततेत परिवर्तित झाला. शेवटी त्या व्यक्तीने आत्महत्येचा निर्णय मागे घेतला होता. आपल्या पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि मद्याच्या नशेत आपलं भान सुटल्याचं त्याने कबूल केलं. बांगर यांच्या संयमी संवादाने आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाने त्याच्या मनातील कल्लोळ शांत झाला. त्या क्षणी केवळ एक जीव वाचला नाही, तर एका घरात पुन्हा एकदा विश्वास आणि आशेचा दिवा पेटला होता.
advertisement
या संपूर्ण घटनाक्रमात पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दाखवलेली सजगता, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण ही केवळ पोलिसी कार्यशैली नव्हती तर ती मानवतेची शिकवण होती. त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या असलेल्या पी.एस.आय. अनुसया डोणे आणि त्यांचे सहकारी, एमआयडीसी पातळगंगा फायर ब्रिगेड टीम आणि हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी दाखवलेला समन्वय ही जबाबदारीच्या पलीकडची माणुसकी होती.
advertisement
संजय बांगर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानत म्हटलं की, "आपण पोलीस आहोत म्हणून नाही, तर माणूस म्हणून आज एका जीवाला वाचवलं हेच खरं यश आहे."
view commentsLocation :
Karjat,Raigad,Maharashtra
First Published :
October 31, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'या बाईसोबत मी राहणार' म्हणत नवरा बाल्कनीच्या ग्रीलवर जाऊन बसला, चौथ्या मजल्यावर हायहोल्टेज ड्रामा, LIVE VIDEO

