आधी म्हणाले कुणाला मटण, कुणाला दारू द्यायची हे चांगलंच माहिती, टीकेनंतर सोळंकेंची कोलांटउडी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Prakash Solanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणूक जिंकण्यासाठीचा वेगळाच पॅटर्न कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितला होता.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : नागपूर पक्ष कार्यालयात लावणी सादर झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पक्षाच्या अडचणी वाढलेल्या असतानाच बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पक्षाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. निवडणुकीत दारू, मटण आणि पैसे वाटावेच लागतात, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली होती. सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी युटर्न घेतला आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडी कापावी लागते, कोणाला बकरं कापावे लागते, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावे लागते हे कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे. माझ्या निवडणुकीत देखील त्यांनी हे काम पार पाडले, अशी कबुली देत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले.
बातमी होण्यासारखा विषय नव्हता पण...
मटण दारूच्या कबुलीजबाबावर सगळीकडून टीका झाल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी स्पष्टीकरण देताना सारवासारव केली आहे. मी ज्या ठिकाणी बोललो ती काही जाहीर सभा नव्हती कार्यकर्त्यांची बैठक होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मरगळ झटकली जावी यासाठी मी विनोदाने बोललो. त्यामध्ये बातमी होण्यासारखा काही विषय नव्हता. या सर्व प्रकारामागे माझे राजकीय विरोधक आहेत असे वाटते, असे सोळंके म्हणाले.
advertisement
प्रकाश सोळंके नेमके काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणूक जिंकण्यासाठीचा वेगळाच पॅटर्न कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितला. विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसांत दारुगोळा कशा पद्धतीने लागतो हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहित आहे. कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडा कापावा लागतो, कोणाला बकरे कापावे लागते, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावे लागते कार्यकर्त्यांना चांगलेच माहित आहे, असे सांगत निवडणूक काळात आपण काय काय करतो याची कबुलीच त्यांनी दिली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Oct 29, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी म्हणाले कुणाला मटण, कुणाला दारू द्यायची हे चांगलंच माहिती, टीकेनंतर सोळंकेंची कोलांटउडी










