सकाळी झेंडावंदन केलं अन् सायंकाळी शेतात काम करताना आक्रित घडलं, रत्नागिरीत महिलेचा करुण अंत; नातेवाईकांचा टाहो
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जयश्री बर्जे या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असल्याने त्यांच्याच हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले होते.
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरीत प्रजासत्ताक दिनाच्या हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील जांभुळनगर गावावर शोककळा पसरली आहे. प्रजासत्ताक दिनी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचा दुर्दैवी अंत झाला आहे. विषारी सर्पदंशाने जांभुळनगर येथील जयश्री जितेंद्र बर्जे (वय 32) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी घडली. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त जयश्री बर्जे या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असल्याने त्यांच्याच हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले होते. कार्यक्रमातही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
advertisement
जयश्री बर्जे या शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. त्या जांभुळनगर येथील रहिवासी असून घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात काम करत असताना सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्या धावत घरी आल्या व घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
बर्जे कुटुंबावर महिन्यात दुसरा आघात
बर्जे कुटुंबावर एका महिन्यात हा दुसरा मोठा आघात आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री बर्जे यांच्या सासऱ्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जयश्री बर्जे शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. त्यांचे पती हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांच्या पश्चात पती, सासू, दहा वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
advertisement
गावावर शोककळा
प्रजासत्ताक दिनी सकाळी ध्वजारोहण करणाऱ्या जयश्री बर्जे यांचे सायंकाळी अशा दुर्दैवी प्रकारे निधन झाल्याने जांभुळनगर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत. जगात सर्वाधिक सर्पदंश हे भारतात होत असून जगभराच्या तुलनेत 80% मृत्यू हे दरवर्षी भारतात होत आहेत. 60 हजार नागरिकांचा मृत्यू हा दरवर्षी सर्पदंशाने भारतात होत असून सर्पदंश मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जागतिक पातळीवरही सध्या प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 7:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सकाळी झेंडावंदन केलं अन् सायंकाळी शेतात काम करताना आक्रित घडलं, रत्नागिरीत महिलेचा करुण अंत; नातेवाईकांचा टाहो








