रुपाली चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या पुढच्या अध्यक्षा कोण? रोहित पवार यांनी सुनेत्राकाकींना ४ नावं सुचवली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर पुढच्या अध्यक्षा कोण? अशी चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चार नावे सुचवली आहेत.
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अध्यात्मिक रुपाला भुलून रुपाली चाकणकर यांनी त्याला गुरू मानले. त्याची पाद्यपूजा करीत गुरूमाऊली म्हणत भावी जीवनाचा मंत्र त्याच्याकडून घेतला. अगदी त्याला पांडुरंग रूप मानून देवाप्रमाणे त्याला पुजले. मात्र त्याच्याबाबत काळे सत्य समोर येताच हात वर करून आपण मुरलेल्या राजकारणी आहोत, हे त्यांनी सिद्ध केले. त्याच्या काळ्या धंद्यांपायी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला. चाकणकर खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर पुढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? अशी चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चार नावे सुचवली आहेत. तसेच हा निर्णय सुनेत्रा काकींनाच घ्यायचाय असे आवर्जून सांगत भाजपने हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितल्याचे बोलले जाते.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. खरात याच्यासोबत चाकणकर यांची अनेक छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने महायुती सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. याआधीही त्यांच्यावर अनेक प्रकरणांत आरोप झाले होते. चमकोगिरी करणाऱ्या म्हणून त्यांना हिणवले गेले. आताही रोहित पवार यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी चमकोगिरी केल्याची टीका केली.
advertisement
पुढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? रोहित पवार यांनी ४ नावं सांगितली
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भीड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
advertisement
महिला अध्यक्षपदासंदर्भातील निर्णय सुनेत्रा काकींनाच घ्यायचाय
वरील नावांचा विचार झाला तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! असे सांगतानाच पुढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण याचा निर्णय सर्वस्वी सुनेत्राकाकींनाच घ्यायचाय, असे सांगताना त्यांचा रोख भाजपकडे असल्याचे दिसते. सुनेत्रा पवार महिला आयोगाच्या अध्यक्षपदासदंर्भात योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रुपाली चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या पुढच्या अध्यक्षा कोण? रोहित पवार यांनी सुनेत्राकाकींना ४ नावं सुचवली










