बारामतीत पवार काका पुतणे पुन्हा एकत्र, विद्या प्रतिष्ठानमध्ये दोघांमध्ये बैठक, राज्यभरात चर्चा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील व्हीआयटीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक संपन्न झाली.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पुन्हा एकत्र आले. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला दोघांनीही उपस्थिती लावली. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचे अंतर होते. याच सभेला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांतील शरद पवार आणि अजित पवार यांची ही तिसरी भेट ठरली.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील व्हीआयटीमध्ये ही सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार, विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, खजिनदार म्हणून युगेंद्र पवार उपस्थित आहेत. या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक देखील झाली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नांच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली होती. जवळपास ४५ मिनिटे चाललेल्या बैठकीची राज्यात चर्चा झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना दोन्ही नेत्यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीला काही दिवसच लोटले असताना आज पुन्हा दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने या भेटीची देखील चर्चा होत आहे.
advertisement
बैठकीत अजित पवार काय म्हणाले?
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत मागील वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसंच आगामी काळात शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला. AI कॉलेज आणि स्मार्ट कृषी केंद्र या नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येणार नाही!
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सर्वांनाच ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो अशा सदिच्छा सुळे यांनी दिल्या.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत पवार काका पुतणे पुन्हा एकत्र, विद्या प्रतिष्ठानमध्ये दोघांमध्ये बैठक, राज्यभरात चर्चा