Amaravati News : पावसामुळे शेतकरी हवालदिल, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने सरकारकडून मदतीची अपेक्षा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पावसामुळे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचे पीक आता पावसामुळे जमिनीतच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार ते सतत रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचे पीक आता पावसामुळे जमिनीतच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर या भागांत सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सततच्या पावसामुळे पिके आता उभ्या अवस्थेतच पिवळी पडत आहेत. जमिनीत पाणी साचल्याने मुळकुज होत असून, शेंगा गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडलेली दिसून येत आहे.
सोयाबीनच्या लागवड खर्चही निघणे कठीण
अमरावती जिल्ह्यांतील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर लोकल18 शी बोलताना सांगतात की, यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झालाय. आताही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला फटका बसलाय. सोयाबीन पिकाला एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च लागतो. ती निघणे देखील कठीण आहे. अती पावसामुळं सोयाबीनची मूळ कुजली आणि सोयाबीन वाळत आहे. तसेच काही सोयाबीन पिवळी पडलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून आता आर्थिक मदतीची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
आधीच रोगांचा प्रादुर्भाव आता पावसामुळे नुकसान
शेतकरी वर्गाला यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाने साथ दिली नाही. सुरुवातीला बुरशीजन्य रोग, पानगळ आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून, जमिनीत पाणी साचल्याने मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शेतांमध्ये शेंगांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडून वाळू लागली आहेत. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
शेतकरी वर्गाकडून जिल्हा प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी सुरू झाली आहे. कृषी तज्ञांच्या मते, पावसामुळे आधीच रोगट झालेल्या पिकांवर अधिक ताण पडला असून, अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण झाले आहे. सोयाबीन हे जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक असल्याने, नुकसानाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्वेक्षण करून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
September 19, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amaravati News : पावसामुळे शेतकरी हवालदिल, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने सरकारकडून मदतीची अपेक्षा