ठाणे, मीरा भाईंदर मेट्रोचे उद्घाटन केव्हा होणार? मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितली डेडलाईन
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Metro- 4 Metro- 9 News: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठाण्यातील मेट्रो 9 आणि मिरा- भाईंदरमधील मेट्रो 4 मार्गावरील मेट्रो लवकरच सुरू होणार आहेत. मेट्रो 9 मार्ग आणि मेट्रो 4 मार्ग डिसेंबर महिन्यामध्ये सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
ठाणे आणि मिरा- भाईंदरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठाण्यातील मेट्रो 9 आणि मिरा- भाईंदरमधील मेट्रो 4 मार्गावरील मेट्रो लवकरच सुरू होणार आहेत. मेट्रो 9 मार्ग 15 डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो 4 मार्ग 31 डिसेंबरपर्यंत सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA ला मेट्रो 9 आणि मेट्रो 4 मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काल (सोमवार- 06 ऑक्टोबर) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA च्या कार्यालयामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये दोन्हीही मेट्रो मार्ग डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले. या बैठकीसाठी महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मांसह इतरत्र संबंधित अधिकारीही उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्र्यांनी MMRDA परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिवाय कामांना गती देण्याबद्दलही कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितले आहे. शिवाय ठाण्यामध्ये आणि मिरा- भाईंदरमध्ये ज्या मार्गावर मेट्रो धावणार आहे, त्या मार्गावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेशही दिले आहेत.
advertisement
मेट्रो पुलाचे काम सुरू असताना त्याखालील मोकळ्या जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये किंवा ती जागा विद्रूप होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सुचवताना मंत्री सरनाईक म्हणाले की नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. या जागांची चांगली देखभाल व्हावी यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्थांची नेमणूक करावी. बैठकीत डोंगरी आणि मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेड प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला. भविष्यात ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे देण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही सरनाईक यांनी केली. यामुळे त्या गावांची संस्कृती आणि परंपरा यांची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
advertisement
मुंबई मेट्रो- 4 (वडाळा- कासारवडवली) आणि त्याचा विस्तार मार्ग- 4A (कासारवडवली – गायमुख) या मार्गांवर 32 स्थानके आहेत. मार्ग- 4 मध्ये 30 स्थानके आहेत, तर 4A मध्ये 2 स्थानके आहेत. मुंबई मेट्रो- 4 चा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. मेट्रो- 9 चा पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशीगाव हा सुद्धा टप्पा डिसेंबरमध्येच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 मेट्रो स्थानके असून 4.973 किमीचा मार्ग असेल. मेट्रो- 9 कॉरिडॉरचे बांधकाम 2019 पासून सुरू आहे. या पूर्ण मार्गावर ऑक्टोबर 2024 पर्यंत सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. विलंब आणि इतर कारणांमुळे मेट्रो सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
Location :
Maharashtra
First Published :
October 07, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाणे, मीरा भाईंदर मेट्रोचे उद्घाटन केव्हा होणार? मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितली डेडलाईन