Beed Rain: पावसाचं रौद्ररूप, अख्खा पूलच गेला वाहून; बीडच्या दोन गावांतील वाहतूक ठप्प
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Beed Rain: या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बीड: यावर्षी बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लिंबागणेश ते बोरखेड या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दैनंदिन कामकाज, शेतीमाल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजच्या प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे, अशी माहिती लिंबागणेश गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.
दोन्ही गावांना जोडणारा पूलच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील शेतकरी भाजीपाला, दूध तसेच सोयाबीन, उडीद, मूग यांसारखा माल बाजारपेठेत पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे अगोदरच संकटात असलेले शेतकरी आणखी त्रस्त झाले आहेत.
advertisement
गेल्या दहा दिवसांपासून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट होत चालली होती. सततच्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि अखेर पुलाचा जवळपास सगळा भाग वाहून गेला. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी धोका पत्करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.
advertisement
स्थानिक नागरिकांच्या मते, या पुलाची दुरुस्ती किंवा नव्याने उभारणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर आगामी दिवसांत शेतकरी तसेच नागरिकांची अडचण अधिक वाढेल. बाजारपेठेशी संपर्क तुटल्याने शेतीमालाच्या नासाडीची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे.
सध्या या मार्गावर प्रवास करणे धोकादायक झाले असून गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यांचा शोध घ्यावा लागत आहे. मात्र हे रस्ते लांब असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Sep 27, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Rain: पावसाचं रौद्ररूप, अख्खा पूलच गेला वाहून; बीडच्या दोन गावांतील वाहतूक ठप्प









