'ही' हंगामी फळे थंडीत वाढवतात रोगप्रतिकारशक्ती, करतील आजारांशी दोन हात
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
हिवाळा सुरू झाला की थंडीबरोबरच सर्दी, खोकला, फ्लू यांसारखे आजार डोकं वर काढतात. या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक ठरते. विशेषतः फळांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते आणि थंडीच्या त्रासांपासून बचाव होतो.
हिवाळा सुरू झाला की थंडीबरोबरच सर्दी, खोकला, फ्लू यांसारखे आजार डोकं वर काढतात. या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक ठरते. विशेषतः फळांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते आणि थंडीच्या त्रासांपासून बचाव होतो. याबाबत “हिवाळ्यात सिट्रस फळे, सफरचंद, डाळिंब यांचा नियमित वापर करणे अत्यंत फायदेशीर आहे”, अशी माहिती डॉ. शुभम थेटे यांनी दिली.
हिवाळ्यात संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी सिट्रस फळे विशेष उपयुक्त मानली जातात. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. शिवाय ही फळे पचन सुधारतात, त्वचेला तजेला देतात आणि शरीरातील थकवा कमी करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सिट्रस फळांचा वापर आरोग्यासाठी वरदान ठरतो.
सफरचंद आणि डाळिंब ही हिवाळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय फळे आहेत. सफरचंदात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते तसेच हृदयाचे आरोग्य मजबूत होते. ‘An apple a day keeps the doctor away’ हे वाक्य सफरचंदाच्या गुणधर्मामुळे खरे ठरते. दुसरीकडे डाळिंब हे रक्तशुद्धीकरणासाठी उपयोगी असून हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक नष्ट करून आजारांना दूर ठेवतात.
advertisement
याशिवाय पेरू, चिकू आणि द्राक्षे देखील हिवाळ्यात खाण्यासाठी फायदेशीर असतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन A आणि C असल्यामुळे डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते. चिकूमध्ये नैसर्गिक साखर आणि भरपूर ऊर्जा असल्यामुळे थंडीत आळस दूर राहतो. तर द्राक्षे हृदय मजबूत ठेवतात तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. या फळांच्या सेवनाने शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात.
advertisement
डॉ. थेटे यांच्या मते, हिवाळ्यात फळांचा नियमित आहार घेतल्याने शरीर तंदुरुस्त राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे थंडीच्या आजारांचा धोका कमी होतो. संतुलित आहारात फळांना स्थान दिल्यास दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकून राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाजारात सहज उपलब्ध होणारी ही फळे आवर्जून खावीत, असा सल्ला त्यांनी दिला.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 20, 2025 5:50 PM IST