Joy Mini Train: टॉय ट्रेननंतर आता मिळणार 'जॉय ट्रेन'ची मजा, कोणत्या पर्यटन स्थळी मिळणार सुविधा?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Joy Mini Train: पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार केला आहे.
मुंबई: महाराष्ट्र हे भौगोलिक विविधता असलेलं राज्य आहे. आपल्या राज्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. शिवाय निसर्गाने देखील मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. त्यामुळे राज्यात अनेक पर्यटन स्थळं आहेत. अशाच महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार केला आहे. राज्यात निवडक ठिकाणी 'जॉय ट्रेन सुरू' करण्याचा विचार केला जात आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर-तापोळा आणि कोयनानगर-नेहरूनगर या दोन ठिकाणी 'जॉय मिनी ट्रेन' सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात माथेरान येथे टॉय ट्रेन चालवली जाते. या ट्रेनला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. याच धर्तीवर जॉय ट्रेनचा उपक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी विविध परवान्यांची गरज लागणार आहे. याशिवाय, सर्व तांत्रिक बाबी तसेच या उपक्रमातून किती आर्थिक नफा मिळेल, या बाबी विचारात घेऊन एक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहेत.
advertisement
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच आपल्या सरकारी निवासस्थानी याबाबत एक बैठक घेतली. याबैठकीला पर्यटन विभागाचे मुख्य सचिव डॉ. अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे उपस्थित होते. यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यासाठी 'जॉय मिनी ट्रेन' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. देशातील काही ठिकाणी या ट्रेनला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील हा उपक्रम राबवला तर फायदा होईल.
advertisement
मोदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाचं औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत दोन विशेष उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील 7500 युवांना प्रशिक्षण देण्यासाठी 'नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम' आणि पाच ठिकाणी पर्यटकांना सुविधा देणारे 'नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र' उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Joy Mini Train: टॉय ट्रेननंतर आता मिळणार 'जॉय ट्रेन'ची मजा, कोणत्या पर्यटन स्थळी मिळणार सुविधा?