संसद गळाली, राम मंदिर गळालं, शिवरायांचा पुतळा पडला, ही मोदी गॅरंटी, ठाकरेंचा कडाडून हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाविकास आघाडीचे चाळीसगांव विधानसभेचे अधिकृत उमेदवार उन्मेश पाटील ह्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली.
जळगाव : लोकसभेला मोदी गॅरंटी ओरडून सांगत होते. विधानसभेला मात्र मोदींची गॅरंटी अजिबातच नाही. का बरं? संसद गळाली, राम मंदिर गळालं, शिवरायांचा पुतळा पडला, ही मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवला.
महाविकास आघाडीचे चाळीसगांव विधानसभेचे अधिकृत उमेदवार उन्मेश पाटील ह्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार लक्ष्य केले. महाराष्ट्रात आता मोदींची गॅरंटी चालत नाही. संसद गळतेय, राम मंदिर बांधले ते देखील गळतेय. सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही मोदींची गॅरंटी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला गद्दारांना सांगायचं आहे की, तुमच्याकडे खूप संपत्ती असेल पण माझ्याकडे जनतेची संपत्ती आहे. समोर बसलेल्या शिवसैनिकांच्या उपस्थितीवरून निवडणूक निकालाचा अंदाज येतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
बऱ्याच दिवसानंतर निवडणूक आयोगाने मला फोटोग्राफीचे काम दिले
बऱ्याच दिवसानंतर निवडणूक आयोगाने मला फोटोग्राफी दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या बॅगेची तपासणी जरूर करा. पण मोदी, अमित शहा, फडणवीस,अजित पवार यांच्या बॅगेची तपासणी करण्याचे धाडस तुमच्यात आहे का? असा यवतमाळमधील प्रसंगही उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत सांगितला.
advertisement
मोदी, अमित शाहा महाराष्ट्र लुटतात, त्यांच्या बॅग चेक करत जा
मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गुजरातचे नव्हे आणि जर गुजरातचे असाल तर गुजरातच्या भाजपच्या कार्यालयात जाऊन बसा. मोदी, अमित शहा हे महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांच्या बॅग जरूर तपासा. अगदी जाताना तर जरूर तपासा कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत असतात, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
advertisement
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याविषयी ठाकरेंना खंत
शांततेत कोर्ट चालू आहे. पक्षफुटीच्या घटनेला तीन वर्ष होऊन गेले तरी निकाल नाही. देशात संविधान बदलले जात आहे, संविधानाची तत्वे पाळली जात नाही म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांच्याकडे मोठे आशेने बघत होतो. पण निकाल काही दिला नाही, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
आमदाराला विकत घेऊ शकता, शेतकऱ्याला मदत का करू शकत नाही
50 खोके देऊन तुम्ही एक एक आमदार विकत घेतला, हे पूर्ण महाराष्ट्रने बघितलं. जर तुम्ही आमदाराला 50 कोटी देऊन विकत घेऊ शकता तर माझ्या शेतकऱ्याला का मदत करू शकत नाही? अशी विचारणा ठाकरेंनी केली.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर शिंदे-फडणवीस
माझा पक्ष चोरला, माझी निशाणी चोरली, माझा बाप चोरला. कारण त्यांना स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर साधला. फडणवीस मला म्हणतात की तुम्ही मुंब्र्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार का? पण ते सत्तेत असताना त्यांनी काय केले? त्यांना माहित नाही की, मुंब्राच्या प्रवेशद्वारावर फुले शाहू आंबेडकरांचे स्मारक आहे, अशी आठवणही ठाकरेंनी करून दिली.
advertisement
राहुल गांधींवरून मोदींची टीका, उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर
मोदी म्हणतात की राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन चांगले शब्द बोलावे पण मोदी साहेबांना माहित नाही की लोकसभेच्या वेळेस राहुल गांधी जेव्हा मुंबईत सभेसाठी आले होते त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला नमन केले होते, अशी आठवणही त्यांनी मोदींना करून दिली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 11, 2024 7:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संसद गळाली, राम मंदिर गळालं, शिवरायांचा पुतळा पडला, ही मोदी गॅरंटी, ठाकरेंचा कडाडून हल्ला










