चार पायांचा 'शेरलॉक'! ब्लॅकीनं असा उघड केला काळजाचा थरकाप उडवणारा पत्नी-प्रियकराचा गुन्हा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उमरगा येथील हत्याकांडाचा छडा ब्लॅकी या श्वानाने लावला. झाकणाचा वास घेत आरोपींपर्यंत पोहोचून ओळख परेडमध्ये प्रियकराला ओळखले. पोलिसांकडून ब्लॅकीचे कौतुक.
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादा पुरावा मागे सोडतोच, असं म्हणतात. पण उमरग्यात या पुराव्याचा माग काढला तो एका श्वानानं! ४ जानेवारी रोजी उमरग्यात झालेल्या एका हत्याकांडाचा छडा लावण्यात 'ब्लॅकी' नावाच्या श्वानाने मोलाची भूमिका बजावली आहे. केवळ वासावरून आरोपींचा मार्ग शोधण्यापासून ते चक्क 'ओळख परेड'मध्ये आरोपीला निश्चित करण्यापर्यंत ब्लॅकीने दाखवलेल्या चातुर्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
४ जानेवारी २०२६ रोजी उमरगा परिसरात एक बेवारस मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले, पण मारेकरी कोण? हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. घटनास्थळी पोलिसांना एक दारूची बाटली आणि तिचं झाकण सापडलं. हाच धागा पकडून पोलीस तपासासाठी 'ब्लॅकी'ला पाचारण करण्यात आलं.
झाकणाचा वास अन् तो रस्ता...
ब्लॅकीने घटनास्थळावरील त्या बाटलीच्या झाकणाचा वास हुंगला आणि तो धावत सुटला. ज्या रस्त्याने आरोपी आले आणि गेले होते, तो संपूर्ण मार्ग ब्लॅकीने पोलिसांना दाखवून दिला. यामुळे तपासाची चक्रं वेगाने फिरली. संशयाची सुई मृताच्या पत्नीकडे वळली. पोलिसांनी जेव्हा अधिक तपास केला, तेव्हा पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं समोर आलं.
advertisement
ओळख परेडमध्येही ब्लॅकीची 'कमाल'
पोलिसांनी संशयित म्हणून पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. मात्र, तांत्रिक पुराव्यासोबतच श्वान पथकाची खात्री पटवण्यासाठी एक 'ओळख परेड' घेण्यात आली. या परेडमध्ये अनेक व्यक्ती उभे असताना ब्लॅकीने थेट त्या प्रियकराला हुंगून त्याच्यासमोर बसकण मारली. ब्लॅकीच्या या अचूक खुणेमुळे पोलिसांचा संशय खात्रीत बदलला आणि आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
advertisement
'ब्लॅकी'चे कौतुक
view commentsउमरगा पोलीस दलातील हा चार पायांचा 'शेरलॉक होम्स' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केवळ एका झाकणाच्या वासावरून पत्नी आणि प्रियकराचा हा क्रूर कट ब्लॅकीने उघड केला. या कामगिरीमुळे पोलीस दलातून ब्लॅकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चार पायांचा 'शेरलॉक'! ब्लॅकीनं असा उघड केला काळजाचा थरकाप उडवणारा पत्नी-प्रियकराचा गुन्हा









